दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-२० क्रिकेटमधल्या २०२१ या वर्षातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटरच्या नावाची रविवारी घोषणा केली. यामध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक १,३२६ धावा करणाऱ्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान याला वर्षातील सर्वोत्तम टी-२० पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार देण्यात आला.
पाकिस्तानला टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीपर्यंत मजल मारुन देण्यात रिझवानचा मोलाचा वाटा होता. या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये रिझवान तिसऱ्या स्थानी होता. दुसरीकडे महिलांमध्ये इंग्लंडच्या टॅमी ब्युमोंटने या पुरस्कारावर मोहोर उमटवली. तिने सुद्धा महिलांच्या टी-२० क्रिकेटमध्ये वर्षभरात सर्वाधिक धावा केल्या. शिवाय घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ती मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली होती. ब्युमोंटने या मालिकेत ३ सामन्यांमध्ये १०२ धावा केल्या होत्या. त्यासोबतच झिशान मकसूद (ओमान) याला मेन्स असोसिएट क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार देण्यात आला. तर एंड्रिया मे जेडेपा (ऑस्ट्रिया) हिला वीमेन्स असोसिएट क्रिकेटर ऑफ द इअर निवडण्यात आले आहे.