रायपूर - रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या अंतिम फेरीत आज इंडिया लिजेंड्स संघाकडून युवराज सिंग आणि युसूफ पठाण यांनी तुफानी फटकेबाजी करून श्रीलंकन लिजेंड्स गोलंदाजांची धुलाई केली. (Road safety world series final) आघाडीचे तीन फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाल्यानंतर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला युवराज सिंग आणि युसूफ पठाणने जबरदस्त फलंदाजी करून इंडिया लिजेंड्सला सुस्थितीत नेले. युवी आणि युसूफ पठाणच्या अर्धशतकांच्या जोरावर इंडिया लिजेंड्स संघाने २० षटकांत ४ बाद १८१ धावा कुटत श्रीलंडा लिजेंड्स संघासमोर १८२ धावांचे आव्हान ठेवले. (Storm of UV-Yusuf Pathan, India Legends scored 181 runs in 20 overs)
या सामन्यात श्रीलंका लिजेंड्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीराकले. त्यानंतर इंडिया लिजेंड्स संघाची सुरुवात चांगली झाली नाही. वीरेंद्र सेहवाग १० धावा काढून हेराथची शिकार झाला. तर बद्रिनाथला अनुभवी जयसूर्याने परतीची वाट दाखवली. त्यानंतर कर्णधार सचिन तेंडुलकरने युवराज सिंगसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सचिनही ३० धावा काढून महरुफची शिकार झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ७८ अशी झाली.
आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यावर युवराज सिंग (६० धावा) आणि युसूफ पठाण (नाबाद ६२ धावा) यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनीही षटकार चौकारांची बरसात करत चौथ्या विकेटसाठी ४७ चेंडून ८५ धावा कुटल्या. या भागीदारीच्या जोरावर इंडिया लिजेंड्सने २० षटकांत १८१ धवा फटकावण्यात यश मिळवले.