मुंबई - क्रिकेटमधील देव समजल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबतभारतासह जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या मनात असलेल्या प्रेमाचे वर्णन शब्दात करता येणारे नाही. म्हणूनच निवृत्तीनंतर इतक्या वर्षांनींही सचिनबाबतचे क्रिकेटप्रेमींच्या मनातील कुतूहल कमी झालेले नाही. त्याचाच प्रत्यय शनिवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर आला. निमित्त होते रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका प्रदर्शनीय क्रिकेट सामन्याचे. या सामन्यात सचिनसह वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंह, ब्रायन लारा आदी दिग्गज खेळाडू उपस्थित राहिले होते. या लढतीदरम्यान, जेव्हा सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग मैदानात उतरले तेव्हा, उपस्थित हजारो क्रिकेट प्रेमींनी सचिन सचिन असा गजर केला आणि उपस्थितांना भारतीय क्रिकेटमधील त्या सचिनमय सुवर्णकाळाची आठवण झाली.
रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टीम इंडिया लेजेंट्स आणि वेस्ट इंडिज लेजेंट्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात वेस्ट इंडिज लेजेंट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५० धावा फटकावल्या.
त्यानंतर टीम इंडिया लेजेंट्स संघाकडून सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग फलंदाजीस उतरले. वानखेडेवर सचिन आणि वीरूची जोडी तब्बल ९ वर्षांनंतर एकत्र फलंदाजीस उतरली. दरम्यान, सचिन आणि वीरूने धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले. सेहवागने आपल्या खास शैलीत चौकार ठोकून डावाला सुरुवात केली. सचिनने ३६ धावा केल्या. तर वीरेंद्र सेहवागने नाबाद ७४ धावांची धडाकेबाज खेळी केली. सेहवागच्या खेळीच्या जोरावर टीम इंडिया लेजेंट्स संघाने हा सामना ७ विकेट्स राखून जिंकला.