गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला आहे. आयएफएमकडून पाकिस्तान आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधून IMF टीम फेब्रुवारीमध्ये परतली. तेव्हा त्यांनी संकटात सापडलेल्या पाकिस्तानला कर्ज देण्याचे कोणतेही ठोस आश्वासन दिले नव्हते, पण काहीतरी करण्याचा विश्वास नक्कीच व्यक्त केला होता. आयएमएफने यापुढेही चर्चा सुरू ठेवण्याबाबत आणि कर्मचारी स्तरावरील करारावर कर्ज देण्याबाबत बोलले होते. 'आम्ही आयएमएफचे सदस्य देश आहोत, पण आम्हाला भिकाऱ्यासारखी वागणूक दिली जात आहे', असल्याचे वक्तव्य एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने केले आहे.
कंगाल झालेल्या पाकिस्तानात महागाईने उच्चांक गाठलेला असताना आता क्रिकेटपटूंच्या घरी चोरी होऊ लागली आहे. पाकिस्तानाचा सीनियर क्रिकेटपटू मोहम्मद हाफिज याच्या घरी चोरी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. रविवारी रात्री ही चोरी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी हाफिज व त्याची पत्नी घरी नव्हती. चोरांनी टाळं तोडून ही चोरी केली. हाफिज सध्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतोय आणि क्रिकेटपटूच्या पत्नीचे काका शाहिद इक्बाल यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वृत्तानुसार हाफिजच्या घरातून १६ लाखांच्या वस्तू व रोख रक्कम चोरीला गेल्या आहेत.
मोहम्मद हाफिजने ५५ कसोटी सामन्यांत १० शतकं व १२ अर्धशतकांसह ३६५२ धावा केल्या आहेत. २१८ वन डे क्रिकेट सामन्यांत त्याच्या नावावर ६६१४ धावा आहेत आणि त्यात ११ शतकं व ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. ११९ ट्वेंटी-२० सामन्यांत त्याने २५१४ धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर २५०+ आंतरराष्ट्रीय विकेट्सही आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"