आयपीएल २०२४ साठी पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर झाले आहे. २२ मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. आयपीएलला सुरूवात होण्याआधीच गुजरातच्या संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कर्णधार हार्दिक पांड्या दुसऱ्या संघात गेल्याने आणि मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर गेल्याने गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे.
अशातच आयपीएल २०२४ च्या लिलावात ३.६० कोटी रुपयांना विकला गेलेला रॉबिन मिंज रस्ते अपघातात जखमी झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्या फ्रँचायझींसोबत चुरस झाल्यानंतर अखेर त्याला गुजरातने खरेदी केले. मिंज स्फोटक खेळीसाठी ओळखला जातो. त्याची मूळ किंमत २० लाख रुपये होती आणि तो ३.६० कोटी रुपयांना विकला गेला.
रॉबिन मिंजचा अपघात
माहितीनुसार, २१ वर्षीय मिंजला सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मिंज हा यष्टिरक्षक फलंदाज आहे. झारखंडमध्ये तो मोटारसायकल चालवत असताना ही घटना घडली. झाले असे की, त्याची दुचाकी दुसऱ्या दुचाकीला धडकली. दरम्यान, मिंजचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. मिंजचे वडील फ्रान्सिस मिंज यांनी आपल्या मुलाच्या अपघाताच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, रॉबिनला केवळ किरकोळ दुखापत झाली असून तो निरीक्षणाखाली असल्याचे त्यांनी सांगितले.
अपघातानंतर बाईकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. त्याचवेळी मिंजच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. रॉबिन कधी तंदुरुस्त होईल याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही आणि त्याच्या खेळाबाबत साशंकता आहे. अलीकडेच गुजरातचा नवनिर्वाचित कर्णधार शुबमन गिलने मिंजच्या वडिलांची भेट घेतली होती.
Web Title: Robin Minz, part of Gujarat Titans for IPL 2024, has met with an accident
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.