अबु धाबी : मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा संघ MI Emirates ने आगामी ILT20 2024 साठी त्यांच्या प्रशिक्षक कर्मचार्यांची नियुक्ती जाहीर केली. रॉबिन सिंग हे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यभार स्वीकारतील आणि त्यांच्यासोबत अजय जडेजा फलंदाजी प्रशिक्षक आणि मिचेल मॅक्लेनाघन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून सामील होतील. मुंबई इंडियन्स फ्रँचायाझीची दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीग आणि यूएईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीगमध्ये गुंतवणूक आहे. SAT20 लीग अर्थात दक्षिण आफ्रिका ट्वेंटी-२० लीग मध्ये MI Cape Town हा त्यांचा संघ आहे.
रॉबिन सिंग २०१० पासून मुंबई इंडियन्स कुटुंबासोबत आहे, त्याने मुंबई इंडियन्सच्या ५ आयपीएल विजयांमध्ये आणि २ चॅम्पियन्स लीग मोहिमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याने २०२३ मध्ये ILT20 च्या उद्घाटन हंगामात MI Emirates चे महाव्यवस्थापक म्हणून काम केले. भारताचा माजी कर्णधार अजय जडेजा MI Emirates चा फलंदाजी प्रशिक्षक असेल. खेळाडू, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून त्याचा मोठा अनुभव आहे.
मिचेल मॅकक्लेनाघनने २०१५ मध्ये मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि संघासोबत ४ विजेतेपदे जिंकली आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पुनरागमन केले. विनय कुमार (सहाय्यक प्रशिक्षक) आणि जेम्स फ्रँकलिन (फील्डिंग प्रशिक्षक) यांच्यावरही जबाबदारी दिली गेली आहे. एमआय एमिरेट्स संघ २० जानेवारी रोजी दुबईमध्ये अवे गेमसह त्यांच्या मोहिमेची सुरुवात करत आहे.
त्याचवेळी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० लीगमधील MI Emirates संघाचा कर्णधार म्हणून निकोलस पूरनचे नाव जाहीर केले गेले आहे. २०२३ मध्ये पोलार्डने या स्पर्धेत MI Emirates चे नेतृत्व सांभाळले होते. निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली MI New York ने MLC मेजर लीग क्रिकेटच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता.