रॉबीन उथप्पा यानं आयपीएल लिलावाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. उथप्पाच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आयपीएल लिलावात खेळाडू जणू एखाद्या वस्तू प्रमाणे भासतात आणि या वस्तूंची खरेदी-विक्री सुरू आहे असं वाटतं, असं विधान रॉबीन उथप्पानं केलं आहे. आयपीएल लिलावात रॉबीन उथप्पाचा देखील समावेश होता. चेन्नई सुपरकिंग्ज संघानं उथप्पा याला २ कोटींच्या बेस प्राइजमध्येच संघात दाखल करुन घेतलं आहे. चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळणार असल्याचं आनंद देखील उथप्पानं लिलावानंतर व्यक्त केला होता. आयपीएलच्या गेल्या पर्वात उथप्पानं चेन्नईसाठी काही चांगल्या खेळी देखील साकारल्या होत्या. पहिल्या क्वालिफायर सामन्यात ४४ चेंडूत ६३ धावांची खेळी साकारली होती. तर फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स विरोधात १५ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या.
रॉबीन उथप्पा आणि त्याचे कुटुंबीय रॉबीन पुन्हा एकदा सीएसकेमध्ये सामील व्हावा अशीच आशा ठेवून होते. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, "सीएसकेसारख्या संघासाठी खेळण्याची माझी इच्छा होती. मला पुन्हा याच संघात स्थान मिळावं यासाठी मी प्रार्थना करत होतो. माझे कुटुंबीय तसंच माझ्या मुलानंही यासाठी प्रार्थना केली. ज्या ठिकाणी सुरक्षित आणि सन्मान प्राप्त होतो अशा संघात पुनरागमन झाल्यानं मी आनंदी आहे"
लिलावात एखाद्या जनावरावंर बोली लागल्यासारखं वाटतंरॉबीन उथप्पानं २००६ आणि २०१५ सालात ४६ वनडे आणि १३ ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावाबाबत बोलताना उथप्पानं एक महत्वाचं विधान केलं. "लिलावात असं वाटतं की तुम्ही खूप आधी एक परीक्षा दिली आहे आणि त्याचा निकाल आता लागणार आहे. तुम्ही एखाद्या पाळीव प्राण्यासारखे वाटता. मला ते पाहून खरंच चांगलं वाटत नाही आणि मला वाटतं की भारतातच असं होतं. एखाद्या खेळाडूच्या कामगिरीबाबत मत असणं वेगळी गोष्ट आहे. पण कोणता खेळाडू किती रुपयाला विकला जाणार यावर चर्चा होणं खूप वेगळी गोष्ट आहे", असं रॉबीन उथप्पा म्हणाला.
"जे खेळाडू अनसोल्ड ठरतात त्यांची मानसिक स्थिती काय असते याचा तुम्ही विचार देखील करू शकत नाही. खूप वाईट वाटतं. ज्या खेळाडूंना लिलावात कोणताही संघ प्राप्त होऊ शकत नाही त्यांचं दु:ख मी नक्कीच समजू शकतो. आयुष्यात अशा घटनांनी खूप नैराश्य येतं", असंही उथप्पा म्हणाला.
सर्वांचं भलं व्हावं यासाठी एक ड्राफ्ट व्यवस्था असायला हवी. जेणेकरुन प्रत्येक खेळाडूचा सन्मान राखला जाईल, असंही उथप्पानं म्हटलं.