Robin Uthappa is unhappy with CSK for allowing Rachin Ravindra to practice in Chennai : चेन्नई सुपर किंग्स (CSK) च्या ताफ्यातून खेळताना दिसलेला रॉबिन उथप्पा आपल्याच माजी फ्रँचायझी संघावर भडकला आहे. माजी भारतीय क्रिकेटरचा पारा चढण्यामागचं कारण आहे ते भारतीय संघाची न्यूझीलंड विरुद्धची मालिका आणि त्या संघाच्या ताफ्यातून दमदार कामगिरी करणारा रचिन रवींद्र. नेमकं काय आहे प्रकरण? "आता माझी सटकली" या तोऱ्यात रॉबिन उथप्पाचा राग अनावर का झाला? जाणून घेऊयात त्यामागची गोष्ट
रॉबिन उथप्पाला CSK ची कोणती गोष्ट खटकली?
नुकतीच न्यूझीलंडच्या संघाने भारत दौऱ्यावर ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. त्यांनी टीम इंडियाला ३-० अशा फरकाने पराभूत करुन दाखवत टीम इंडियाची घरच्या मैदानातील विजयी मालिकेचा सिलसाला खंडीत केला. न्यूझीलंड संघाच्या विजयात रचिन रवींद्र याने मोलाचा वाटा उचलला होता. या किवी फलंदाजासाठी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आपल्या अकादमीत सरावाची परवानगी दिली होती. हीच गोष्ट रॉबिन उथप्पाला खटकली आहे.
टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव अन् त्यामागचं CSK कनेक्शन रॉबिन उथप्पानं एक व्हिडिओ शेअर करत चेन्नई सुपर किंग्सच्या त्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे. तुमच्या ताफ्यातून खेळणाऱ्या खेळाडूवर कितीही प्रेम उधळा, पण प्रश्न ज्यावेळी देशाचा असेल त्यावेळी मर्यादा ओलांडू नयेत, अशा शब्दांत उथप्पानं आपला राग व्यक्त केला आहे. रचिन रवींद्र याला भारतीय परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी CSK नं जी मदत केलीये ती गद्दारीच आहे, अशा अर्थाने उथप्पानं या फ्रँचायझी संघावर निशाणा साधल्याचे दिसते.
रचिन रवींद्रनं CSK च्या मदतीनं खेळला हा डाव
भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेआधी न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तान ग्रेटर नोएडातील एकमेव कसोटी सामन्यासाठी भारतात आला होता. या मालिकेआधी रचिन रवींद्र यांनी भारतीय परिस्थितीत उत्तम खेळ करण्याच्या उद्देशाने CSK च्या चेन्नईतील अकादमीत सरावाला पसंती दिली होती. ज्याचा त्याला भारत दौऱ्यावरील सामन्यात फायदाही झाला.
टीम इंडियाविरुद्धच्या मालिकेत त्याला झाला मोठा फायदा
बंगळुरुच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रचिनच्या भात्यातून पहिल्या डावात १३४ धावांची खेळी आली होती. दुसर्या डावात त्याने नाबाद ३९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पहिल्या विजयानं आत्मविश्वास दुणावलेल्या किवी संघानं टीम इंडियाला व्हाइट वॉश करत इतिहास रचला. ज्यात रचिन रवींद्रची भूमिकाही महत्त्वपूर्ण राहिली होती.