युवराज सिंगचे भारतीय क्रिकेटमधील योगदान अमूल्य आहे. त्याने २००७ सालचा टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर २०११ सालचा आयसीसी विश्वचषक जिंकून देण्यात निर्णायक भूमिका निभावली होती. मात्र, याच अष्टपैलू खेळाडूला तंदुरुस्ती चाचणीबाबत काही गुणांची सूट देण्यात तत्कालीन भारतीय कर्णधाराने नकार दिला. यामुळे त्याला अपेक्षेहून लवकर क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली, असे भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने म्हटले.
कॅन्सरवर मात करून दमदार कमबॅक
२०११ सालचा विश्वचषक जिंकल्यानंतर युवराजला कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. यानंतर त्याने अमेरिकेत उपचार घेत कॅन्सरवर यशस्वीपणे मात करुन दमदार पुनरागमन केले. त्याने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय शतकही झळकावले. परंतु, २०१७ सालच्या खराब कामगिरीनंतर त्याला संघातून वगळण्यात आले आणि नंतर युवीने २०१९ साली निवृत्ती घेतली.
दोन गुणांची सूट मिळाली नाही
उथप्पाने एका मुलाखतीत म्हटले की, "युवराजने कॅन्सरला नमवून जेव्हा पुनरागमन केले होते, तेव्हा त्याने तंदुरुस्ती चाचणीत दोन गुणांची सूट मागितली होती. त्याला ही सूट मिळाली नाही. तो तंदुरुस्ती चाचणी पास करून संघात आला होता. पण, एका स्पर्धेतील खराब कामगिरीनंतर त्याला बाहेर केले."
विराटचे नेतृत्व 'माय वे'
उथप्पाने विराट कोहलीच्या नेतृत्व शैलीबाबतही वक्तव्य केले. त्याने म्हटले की, मी विराटच्या नेतृत्वात फार खेळलो नाही; पण, एक कर्णधार म्हणून 'माय वे' किंवा 'हायवे' (सर्वकाही माझ्या मर्जीनुसार करणे) प्रमाणे होता. कर्णधारपद केवळ निकालापुरते नसते, तर आपला संघ आणि सहकाऱ्यांसोबत करण्यात येणाऱ्या व्यवहाराशीही जुळलेले असते.
दोन विश्वविजेतेपदांमध्ये महत्त्वाची भूमिका
उथप्पाने पुढे म्हटले की, युवीने कॅन्सरला नमवले होते. त्या व्यक्त्तीने आपल्या दोन विश्वविजेतेपदांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली होती. जेव्हा तुम्ही कर्णधार असता, तेव्हा अशा खेळाडूसाठी म्हटले जाते की, त्याच्या फुप्फुसांची क्षमता कमी झाली आहे. विशेष म्हणजे तुम्ही त्याला संघर्ष करताना पाहिले आहे. मला कोणी याविषयी सांगितले नाही; पण, मी गोष्टींचे विश्लेषण करतो. तुम्ही त्याला संघर्ष करताना पाहिले, नंतर जेव्हा तुम्ही कर्णधार बनता तेव्हा काही मर्यादा ठेवता. पण, काही गोष्टींमध्ये अपवाद असतात आणि या व्यक्तीला अपवादासाठी पात्र ठरण्याचा हक्क होता, असेही माजी क्रिकेटनं म्हटलं आहे.
Web Title: Robin Uthappa takes indirect dig at Virat Kohli's captaincy for cutting short Yuvraj Singh's career
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.