मुंबई : भारताचा जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीचा जगातील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज आहे. त्याच्या आगळ्यावेगळ्या शैलीनं भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवली आहे. विशेषतः अखेरच्या षटकांत त्याच्या यॉर्करचा अचूक मारा प्रतिस्पर्धींना हैराण करून टाकणारा असतो. गेल्या वर्षभरातील त्याची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे आणि अल्पावधीतच तो भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. त्याच्या कामगिरीच्याच जोरावर मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले.
गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीमुळे बुमराह ओळखला जातो. त्याच्या या शैलीचा अंदाज बांधणे अनेक फलंदाजांना अडणीचे जाते. नव्या चेंडूवर रिव्हर्स स्वींग करणे ही बुमराहची खासियत... तो चेंडू जुना झाल्यावरही फलंदाजांना हैराण करतो. त्यामुळेच सध्याच्या घडीचा तो सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. आयआयटी कानपूरचे प्रोफेसर संजय मित्तल यांनी बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीवर स्वतंत्र अभ्यास केला आणि त्याच्या शैलीमागचं रॉकेट सायन्स समजावून सांगितले.
Indian Expressमध्ये छापून आलेल्या मित्तल यांच्या लेखात 'रिव्हर्स मॅगनस फोर्स' ला बुमराहच्या गोलंदाजीमागचं रहस्य सांगण्यात आले आहे. त्याने सांगितले की, बुमराहने टाकलेल्या चेंडूची गती, सीम पोझिशन आणि 1000 आरपीएमची रोटेशन स्पीड चेंडूला 0.1चा स्पीन रेश्यो देतो. या कारणामुळे बुमराच्या गोलंदाजीला वेग मिळतो आणि फलंदाजाला त्याचा अंदाज बांधणे कठीण जाते. अहवालानुसार एखादी गोल वस्तू हवेतून जाताना तिच्या सभोवती हवेचा एक पातळ पडदा तयार होतो. हा पडदा त्या वस्तूच्या पृष्ठभागापासून विशिष्टवेळी वेगळा होतो. यात टर्ब्युलन्स ही पण एक गोष्ट असते. जर गोल वस्तूचा वेग कमी असेल तर टर्ब्युलन्स कमी असते आणि वस्तूचं वहन सुलभतेने होते. परंतु जसा वेग वाढतो तशी टर्ब्युलन्स व अनियमितता वाढते.
25 वर्षीय बुमराहने दमदार कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये 77 सामन्यांत 82 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 49 वन डे सामन्यांत 85, 10 कसोटी सामन्यांत 49 आणि 42 ट्वेंटी-20 सामन्यांत 51 विकेट्स घेतल्या आहेत.