मुंबई : बीसीसीआयची वार्षिक आमसभा आज (मंगळवारी) होत आहे. आमसभेत बोर्डाचे ३६ वे अध्यक्ष म्हणून ६७ वर्षांचे रॉजर बिन्नी हे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारतील. निवडणूक निर्विरोध झाली असून, केवळ औपचारिकता पार पाडली जाणार आहे. याशिवाय आयसीसी चेअरमनपदाची निवडणूक लढवायची की नाही, याविषयीदेखील चर्चा होणार आहे.
आयसीसीची निवडणूक लढवायची की सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांना पाठिंबा द्यायचा, यावर सदस्य चर्चा करणार आहेत. आयसीसी अध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर आहे. दि. ११ ते १३ नोव्हेंबर या कालावधीत मेलबोर्न येथे आयसीसीची आमसभा होईल. गांगुलीच्या गच्छंतीबाबत क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
आयसीसी अध्यक्ष पदासाठी गांगुलीचे नाव पुढे केले जाते का? हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे. ज्या अन्य नावांवर चर्चा अपेक्षित आहे, त्यात क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा समावेश आहे. श्रीनिवासन हे ७८ वर्षांचे आहेत तर ठाकूर हे आयसीसी बोर्डाच्या बैठकीदरम्यान व्यस्त असण्याची शक्यता आहे. बिन्नी यांना अध्यक्षपदाची खुर्ची सोपविणार असलेले सौरव गांगुली स्वत: बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष या नात्याने यापुुढे आमसभेला हजेरी लावणार आहेत.
ममतांची सौरव गांगुलीसाठी फिल्डिंगपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी सौरव गांगुलीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले. सौरव गांगुलीला आयसीसीची निवडणूक लढविण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती ममता यांनी पंतप्रधानांना केली आहे. गांगुलीला बीसीसीआय अध्यक्षपदाची दुसरी संधी नाकारण्यात आली. यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच ममता बॅनर्जीं यांनी या वादात उडी घेतली. ममता यांनी गांगुलीसाठी जोरदार बॅटिंग केली. त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली.
बोर्डाच्या पदाधिकाऱ्याने स्वत:चे नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, जय शाह आयसीसी बोर्डात भारताचे प्रतिनिधित्व करतील, हे ठरले आहे. तथापि आयसीसी चेअरमनपदाची निवडणूक लढवायची की न्यूझीलंडचे बार्कले यांना पाठिंबा द्यायचा, हे ठरवावे लागेल.
आमसभेच्या कामकाज पत्रिकेनुसार भारतीय क्रिकेटर्स संघटनेच्या दोन प्रतिनिधींना बीसीसीआय कार्यकारिणीवर घ्यायचे आहे. दोन्ही नवे चेहरे अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचे स्थान घेतील. धूमल हे आमसभेनंतर नव्याने स्थापन झालेल्या आयपीएल संचालन परिषदेचे अध्यक्षपद सांभाळतील. यात आयपीएल लिलावाचे स्थान आणि वेळेचा निर्णय घेतला जाईल. मार्चमध्ये आयोजित होणाऱ्या पहिल्या महिला आयपीएलवरही चर्चा केली जाईल.
भारतात पुढच्या वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी केंद्र शासनाकडून करसवलत मिळविण्याचा मुद्दा आमसभेत असेल. केंद्र शासनाने करसवलत नाकारल्यास बीसीसीआयला ९५५ कोटींचे नुकसान सोसावे लागणार आहे.