Rohan Jaitley BCCI Secretary: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. जय शाह हे सचिव पदी आल्यानंतर BCCIची भरभराट झाली असे म्हटले जाते. आता जय शाह हे ICC च्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे BCCI मधील त्यांची जागा कोण घेणार याबाबत प्रश्न आहेत. या नावासाठी भाजपाचे दिवंगत ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांच्या नावाची चर्चा आहे. पण रोहन जेटली आणि क्रिकेट याचा संबंध काय? असा प्रश्न काहींना पडल्याचे दिसते. त्याबद्दल जाणून घेऊया.
दिल्ली क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
अरुण जेटली यांच्या निधनानंतर फिरोजशाह स्टेडियमला अरुण जेटली स्टेडियम असे नाव देण्यात आले. अरुण जेटली यांचे दिल्ली क्रिकेट, क्रिकेटपटूंशी घनिष्ट नाते होते. ते खेळाडूंच्या सुख-दुःखात त्यांच्यासोबत असत असे वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरा यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी वेळोवेळी सांगितले आहे. आता त्यांचा मुलगा रोहन जेटली भारतीय क्रिकेटच्या सर्वोच्च संघटनेत महत्त्वाचे पद भूषवण्याची शक्यता आहे. अवघ्या ३५ वर्षांचे असलेले रोहन जेटली यांनी दिल्ली क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद समर्थपणे भूषवले आहे. रोहन जेटली यांनी जेव्हा दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या (DDCA) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा त्यांनी नामांकनाच्या शेवटच्या दिवशी आपले नाव दिले होते. तोपर्यंत अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आला होता. रोहन यांनी अर्ज भरताच एकमेव उमेदवाराने आपला अर्ज मागे घेत रोहन जेटली यांची DDCA अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
रोहन जेटलींनी DDCA मध्ये काय केले?
दिल्ली क्रिकेट संघटनेत गेल्या तीन-चार वर्षांत प्रमुख सुधारणा झाल्या. दिल्लीच्या स्टेडियममधील जुन्या पॅव्हेलियनचा मोठा भाग दुरुस्त करण्यात आला. रोहन जेटली अध्यक्ष झाल्यानंतर इतरही काही बदल करण्यात आले आहेत. याशिवाय रोहन यांच्या कार्यकाळात दिल्लीच्या मैदानाच्या खेळपट्टीच्या दर्जावरही चांगले काम केले जात आहे. विश्वचषकादरम्यान या स्टेडियमची सुधारणा करण्यात आली. ते ‘अपग्रेडेशन’ रोहन यांच्यात काळातच आहे. दिल्ली क्रिकेटमध्ये अजून बराच पल्ला गाठायचा आहे, असे रोहन म्हणतात. DDCA आणि BBCIच्या राजकारणात खूप फरक आहे. त्यामुळे जर नवी जबाबदारी आली तर रोहन यांच्या क्षमतेचा कस लागेल यात शंका नाही.