- सौरभ गांगुली
सुपर फोरच्या लढतींना सुरुवात झाली असून साखळी फेरीतील गुणांना आता अर्थ नाही. भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता २८ सप्टेंबरला अंतिम लढतीत नक्कीच खेळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाने खेळाच्या प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या स्पर्धेत कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे.
भारत-पाक लढतीबाबत मोठी उत्सुकता असते, पण गेल्या ८-९ वर्षांत उत्सुकता सत्यात उतरत नाही. पूर्वीचा पाकिस्तान संघ आणि सध्याचा पाकिस्तान संघ यात मोठी तफावत आहे आणि भारतीय संघ प्रत्येक विभागात बलाढ्य आहे. प्रत्येक जण गेल्या वर्षीच्या चॅम्पियन ट्रॉफीबाबत चर्चा करतात. त्यावेळी पाकिस्तान संघाच्या कामगिरीचा आलेख लढतीगणिक चढता होता. त्यांनी इंग्लंडविरुद्ध मिळवलेला विजय आणि त्यानंतर अंतिम लढतीत भारताविरुद्ध मिळवलेले यश उल्लेखनीय ठरले होते. प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये पाकिस्तान संघाने रणनीतीनुसार खेळ करायला हवा. दडपण असलेल्या लढतीत त्यांच्या फलंदाजांची फटक्याची निवड हा चर्चेचा विषय आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये बराच बदल झाला आहे, पण या स्पर्धेत सर्व संघांकडून जुन्या पद्धतीची फलंदाजी होणे गरजेचे आहे. स्पर्धेच्या वाटचालीसह खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल ठरल्या तर आश्चर्य वाटायला नको. कारण उष्ण वातावरणात एकाच खेळपट्टीवर वारंवार सामने होणार असेल तर तसे घडणारच. त्यामुळे भारतीय संघात अनेक फिरकीपटूंचा समावेश असण्याचे आश्चर्य वाटत नाही. ज्या संघात दर्जेदार फिरकीपटू असतील त्यांना वर्चस्व गाजवण्याची संधी राहील. अखेरपर्यंत विकेट सांभाळणे यशाचा मंत्र आहे आणि यापूर्वीच्या लढतींमध्ये पाकिस्तानबाबत असे घडलेले नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतीत पाकिस्तान संघाच्या खराब फॉर्मची प्रचीती आली, पण अफगाणच्या फिरकीपटूंना कमी लेखण्याची चूक करता येणार नाही.
दुसऱ्या बाजूचा विचार करता भारतीय संघाची कामगिरी शानदार ठरली आहे. रोहितने फलंदाज व कर्णधार म्हणून आपली भूमिका चोख बजावली आहे.
हाँगकाँगविरुद्धच्या लढतीचा अपवाद वगळता त्याची व संघाची कामगिरी उल्लेखनीय झाली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धवन शानदार असून या स्पर्धेतही त्याने लौकिकाला साजेशी कामगिरी केली. रोहित शर्मासोबत त्याने सलामीला केलेल्या भागीदारीमुळे भारतीय संघावर कसलेच दडपण आले नाही. भारताची गोलंदाजीची बाजू मजबूत आहे. भुवनेश्वर आणि बुमराह भारतीय संघासाठी कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटसाठी मोठा ठेवा आहे.
त्यामुळे भारतीय संघाला दडपणाखाली आणण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला चांगली फलंदाजी करीत मोठी धावसंख्या उभारणे आवश्यक आहे. (गेमप्लॅन)
Web Title: Rohit also left the mark as captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.