सिडनीभारतीय क्रिकेट संघ सध्या दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पण संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्मा अजूनही भारतातच बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतच आहेत.
पुढील चार दिवसांत रोहित आणि इशांत शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले नाहीत तर त्यांना या दौऱ्याला मुकावं लागू शकतं. कारण भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी तसं बीसीसीआयला कळवलं आहे.
कोरोनामुळे ऑस्ट्रेलियात सध्या १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी खेळाडूंना पूर्ण करावा लागतो. क्वारंटाइनसंबंधीचे नियम ऑस्ट्रेलियात खूप कडक आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत रोहित आणि इशांत ऑस्ट्रेलियात दाखल झाले नाहीत, तर त्यांना सामना खेळता येऊ शकणार नाही, असं शास्त्री यांनी स्पष्ट केलं आहे.
रोहित आणि इशांत शर्मा सध्या बंगळुरूतील एनसीएमध्ये फिटनेस चाचणीला सामोरे जात आहेत. रोहित शर्मा दुखापतीमुळे २७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या सामन्यांत खेळू शकणार नाहीय. दोघांनाही कसोटी सामन्यांमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना तातडीने ऑस्ट्रेलियासाठी रवाना व्हावं लागेल, असं शास्त्री यांनी म्हटलंय.
रोहित आणि इशांत दोघंही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी सामने खेळणार की नाही याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियासाठी कधी रवाना होणार याबाबतही कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावं लागणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ ३ एकदिवसीय आणि तितकेत टी-२० सामने खेळणार आहे. तर उभय देशांमध्ये १७ डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.