नवी दिल्ली : भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९८ सामने एकत्र खेळले आहेत. मात्र या दोघांनी एकदाही एकत्र फलंदाजी केलेली नाही. याबाबतचा ४०८ सामन्यांचा विश्वविक्रम सनथ जयसूर्या आणि मुथैय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या आंतररष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. त्यातून सावरल्यावर पुन्हा क्रिकेट सुरू होईल. रोहित आणि बुमराह त्या जोडीत सहभागी होऊ शकतात. त्यांनी १०० पेक्षा जास्त सामने एकत्र खेळले आहेत. तरीही एकत्र फलंदाजी केलेली नाहीत. रोहित आणि बुमराह यांनी आतापर्यंत चार कसोटी सामने, ५५ एकदिवसीय सामने आणि ३९टी२० सामने एकत्र खेळले आहे.
रोहित २०१३ पासून संघाचा नियमीत सलामीवीर आहे. तर बुमराहने २०१६ मध्ये संघात पर्दापण केले होते. त्याने आतापर्यंत १२८ आंतरराष्ट्रीय सामन्यात फक्त ४२ डावातच फलंदाजी केली. त्यात ३४ डावात तो ११ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. रोहितने ९८ सामने बुमराह सोबत खेळले आहेत. त्यात १०१ डावांपैकी या जलदगती गोलंदाजाने २३ डावात फलंदाजी केली आहे.
गमतीची बाब म्हणजे २३ डावांपैकी बहुतेक डावात रोहितला मोठी खेळी करता आली नाही. रोहितने या सामन्यांमध्ये फक्त एक शतक आणि दोन अर्धशतके लगावली आहेत. यात १८ डावात तर तो १५ च्या पुढे देखील जाऊ शकला नाही. रोहितने त्यासोबतच युजवेंद्र चहल आतापर्यंत ८० आंतरराष्ट्रीय सामने (४७ एकदिवसीय आणि ३३ टी २०) यामध्ये एकत्र फलंदाजी केलेली नाही.
भारतीय कर्णधार विराट कोहली आणि चहल यांनी देखील ६४ सामने (३९ एकदिवसीय आणि २५ टी२० ) एकत्र खेळले आहेत. मात्र तरीही हे दोन्ही खेळाडू एकाचवेळी खेळपट्टीवर येऊ शकले नाहीत. सर्वाधिक सामने एकत्र खेळूनदेखील एकाच वेळी फलंदाजीला न येण्याचा विक्रम श्रीलंकेच्या सनथ जयसूर्या आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या नावावर आहे. या दोघांनी ४०८ सामन्यात एकत्र खेळ केला. मात्र एकदाही दोघांना एकत्र फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही.
मुरलीधरन याने २६७ डावात फलंदाजी केली. मात्र त्यावेळी जयसूर्या हा बाद झालेला असायचा. जयसूर्याने आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात सहाव्या क्रमांकावर केली होती. मात्र प्रत्येकवेळी जयसूर्या बाद झाल्यानंतर ११ व्या क्रमांकावरील मुरलीधरनला संधी मिळत होती.