बेंगळुरू : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आलेला वन डे संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने गुरुवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेस सरावास सुरुवात केली. या दौऱ्यात रोहित भारतीय वन डे संघात नाही, हे विशेष. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करीत जेतेपद पटकविल्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला कसोटीसाठी संशोधित संघात स्थान दिले होते.
रोहितने त्यावेळीदेखील आपण फिट असल्याचे ठासून सांगितले, पण दुसरीकडे बीसीसीआय निवडकर्त्यांचा रोहित आयपीएल सामन्यात हॅमस्ट्रिंगमुळे जखमी असल्याचा समज झाला होता. त्याला तंदुरुस्त होण्यास वेळ लागेल, असे त्यांना वाटले असावे. यावरून रोहित फिट आहे की नाही, या मुद्यावरून वाद सुरू झाला होता. मुंबईच्या जेतेपदात रोहितने फायनलमध्ये ६८ धावांचे योगदान दिले होते. नियमित कर्णधार विराट कोहली हा पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार असून नंतरच्या तिन्ही कसोटी सामन्यात तो खेळणार नाही.
बुधवारी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा याने मुख्य निवडकर्ते सुनील जोशी आणि एनसीए संचालक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजीचा सराव केला. तो जखमेतून सावरत असून एनसीएत पुनर्वसन प्रक्रियेत सहभागी झाला आहे. ईशांत आणि रोहित हे एकाचवेळी ऑस्ट्रेलियाकडे प्रस्थान करणार आहेत. संघात सहभागी होण्याआधी दोघांनाही १४ दिवस विलगीकरणात राहावे लागेल.
सिडनी : मार्चनंतर स्पर्धात्मक क्रिकेट न खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी गुरुवारी नेटस्मध्ये कसून सराव केला. तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध सहज खेळत असल्याचे दिसून आले. पुजाराने ‘साईड नेट’ आणि ‘सेंटर स्ट्रीप’ या दोन्ही नेटस्मध्ये फलंदाजीचा सराव केला. त्याने ईशान पोरेल व कार्तिक त्यागी यांच्या व्यतिरिक्त उमेश यादव व रविचंद्रन अश्विन यांच्या माऱ्यावर सराव केला.
बीसीसीआयने सोशल मीडियावर पुजाराच्या नेट सत्राचा छोटेखानी व्हिडिओ शेअर केला. भारतीय संघाला आपल्या १४ दिवसाच्या विलगीकरण कालावधीदरम्यान सरावाची परवानगी देण्यात आली आहे. भारतीय संघ गेल्या आठवड्यात येथे दाखल झाला. वन-डे व टी-२० मालिका २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर चार कसोटी सामन्याच्या कसोटी मालिकेला ॲडिलेडमध्ये १७ डिसेंबरपासून सुरुवात होईल. भारतीय संघातील जास्तीत जास्त खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळले होते, कसोटी संघातील नियमित खेळाडू पुजारा व हनुमा विहारी ऑस्ट्रेलियात दाखल होण्यापूर्वी संयुक्त अरब अमिरातमध्ये राष्ट्रीय संघाच्या बायोबबलसोबत जुळले होते.
पुजारा दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात भारताच्या ऐतिहासिक विजयात महत्त्वाचा खेळाडू ठरला होता. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेषत: विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर पहिल्या बाळाच्या जन्मासाठी मायदेशी परतणार आहे. त्यामुळे पुजारावर विशेष जबाबदारी राहणार आहे. पुजाराने आपली अखेरची लढत रणजी ट्रॉफी फायनल खेळली होती.