सिडनी : भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापेक्षा रोहित शर्माच्या दुखापतीची अधिक चर्चा सुरू आहे. विराट कोहलीने रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल मौन सोडले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये रोहित शर्मा का खेळू शकला नाही, याबाबत मीसुद्धा अनभिज्ञ आहे. परंतु रोहितच्या दुखापतीच्या स्थितीबाबत स्पष्टतेचा अभाव आणि गोंधळच अधिक होता, असे ताशेरे विराटने ओढले. विराट कोहलीच्या या वक्तव्यानंतर बीसीसीआयने शुक्रवारी रोहित शर्माबाबत स्पष्टीकरण दिले.
रोहितच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडे रवाना न होता तो मुंबईत परतला, असे बीसीसीआयने म्हटले आहे. रोहित शर्माची फिटनेस चाचणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे. त्यानंतर तो कसोटी मालिकेसाठी रवाना होणार की नाही याबाबत स्पष्ट होईल. मांडीला झालेल्या दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर रोहित शर्मा सध्या बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करीत आहे. वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रोहित शर्मा एनसीएमध्ये दाखल झाला. नोव्हेंबर महिन्याच्या पूर्वार्धात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी झालेल्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीआधीच रोहितने आपल्या अनुपलब्धतेबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवले होते.
ईशांत मालिकेत नाहीईशांत शर्मा याच्यासंदर्भात बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले, ‘तो डाव्या हाताच्या दुखण्यातून सावरला असून मॅच फिटनेस मिळविण्यासाठी काही वेळ लागणार आहे. याच कारणांमुळे ईशांत मालिकेत खेळू शकणार नाही.’ बीसीसीआयच्या क्रिकेट संचालन समितीमुळे रोहितबाबत ही स्थिती उद्भवल्याची माहिती आहे. रोहित ऑस्ट्रेलियाकडे रवाना होणार असेल तर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हे सीए प्रमुख निक हॉकले यांना १४ दिवसांच्या विलगीकरणादरम्यान रोहितला सराव करू द्यावा, अशी विनंती करणार आहेत.