नवी दिल्ली ।
भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाची नजर मालिकेवर कब्जा करण्यावर असेल. सामन्याचा निकाल कोणत्याही क्षणी बदलण्याची ताकद असणाऱ्या खेळाडूंचा भरणा भारतीय संघात असणार आहे. तर भारताच्या एका स्टार खेळाडूची तब्बल २ वर्षांनंतर संघात एन्ट्री झाली आहे. घातक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूचे करिअर संपल्याची चर्चा रंगली असतानाच त्याचे संघात पुनरागमन झालं आहे.
मोहम्मद शमीच्या पुनरागमनामुळं गोलंदाजी होणार बळकट
इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी मोहम्मद शमीला भारतीय संघात स्थान मिळालं आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून शमीची जगभर ख्याती आहे. कोणत्याही खेळपट्टीवर प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना चितपट करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. विशेष म्हणजे शमीने भारतीय संघाचं नोव्हेंबर २०२० मध्ये शेवटचं प्रतिनिधीत्व केलं होतं. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी त्याचं संघात पुनरागमन होत आहे.
घातक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध
मोहम्मद शमीकडे एकदिवसीय क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे, जो संघाला एक चांगली ताकद देऊ शकतो. शमीची स्विंग भल्याभल्या फलंदाजांना गारद करते. २०१९ च्या विश्वचषकात त्याने अफगाणिस्तानविरूद्ध शानदार हॅट्रिक घेतली होती. त्यामुळे शमीच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंडच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
भारतीय संघासाठी मोठं योगदान
महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाच्या काळात मोहम्मद शमीनं भारतीय संघात पदार्पण केलं होतं. त्यानं आतापर्यंत भारतासाठी ६० कसोटी सामन्यांमध्ये २१६ बळी, ७९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १४८ बळी आणि १७ टी-२० सामन्यांमध्ये १८ बळी घेतले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र यावेळी प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आहे.
Web Title: Rohit-Dravid saves Mohammed Shami career, suddenly entry Indian team after 2 years
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.