अहमदाबाद : नवा कर्णधार रोहित शर्मा याच्या उपस्थितीत भारतीय संघ आज, रविवारी वेस्ट इंडीजविरुद्ध सुरू होत असलेल्या वन-डे मालिकेच्या पहिल्या सामन्यासह नव्या इनिंगची सुरुवात करणार आहे. मधल्या फळीचे अपयश पुसून टाकण्याचे अवघड आव्हान रोहित-राहुल द्रविड या जोडीगोळीपुढे असेल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर मालिकेचा पहिला सामना भारताचा ऐतिहासिक हजारावा सामना आहे.
भारतीय संघ २०२३ च्या वन-डे विश्वचषकाची तयारी सुरू करणार आहे. २०१५ आणि २०१९च्या विश्वचषकात चषकावर नाव कोरण्यात टीम इंडियाला अपयश आले होते. त्यामुळे वास्तविक, बदलाची रणनीती स्वीकारावी लागत आहे. कमकुवत मानल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या भूमीत पराभूत झाल्यानंतर वन-डेचा नवा कर्णधार रोहितसोबत विजयी लय कायम करावीच लागेल. रोहित-राहुल जोडीकडून ५० षटकांच्या सामन्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी संघात फेरबदल अपेक्षित आहेत. ही मालिका मधल्या फळीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी योग्य व्यासपीठ असणार आहे.
राहुलची अनुपस्थिती, तसेच ऋतुराज आणि शिखर धवन हे पॉझिटिव्ह असल्याने रोहित स्वत: इशान किशनसह डावाला सुरुवात करेल. रोहित फॉर्ममध्ये असेल तर कोणत्याही गोलंदाजांना तो फोडून काढू शकतो. आक्रमक सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा यांच्याकडे क्षमता सिद्ध करण्याची संधी असेल. याशिवाय विराटची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचेच लक्ष असेल.
गोलंदाजीबाबत बोलायचे तर २७ वर्षांचा कुलदीप यादव जुलै २०२१ नंतर पुन्हा संघात परतला. दुसरीकडे व्यवस्थापनाने जोधपूरचा युवा गोलंदाज रवी बिश्नोई याला संघात स्थान दिले. त्याला संधी मिळेल का, याची उत्कंठा आहे. बुमराह आणि शमी यांना विश्रांती दिल्याने शार्दुल ठाकूर याच्याकडे फलंदाजी- गोलंदाजीत विश्वास संपादन करण्याची ही मोठी संधी असेल. मोहम्मद सिराज, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान या वेगवान गोलंदाजांपैकी कुणाला खेळवायचे याचा निर्णय सामन्याआधी होईल.
विंडीज संघ इंग्लंडला टी-२० मालिकेत लोळवून येथे दाखल झाला. पॉवर हिटर निकोलस पूरन हा मॅचविनर संघात आहे. कर्णधार किरोन पोलार्ड आणि अनुभवी अष्टपैलू जेसन होल्डर हे कामगिरीद्वारे सामना फिरवू शकतात.
ईशान किशन सलामीला खेळेल : रोहित
अहमदाबाद- विंडीजविरुद्ध पहिल्या वन डेत ईशान किशन सलामीला फलंदाजी करणार असल्याचीे माहिती कर्णधार रोहित शर्मा याने दिली. मयांक अग्रवाल क्वारंटाईन असून, ऋतुराज व शिखर धवन हे पॉझिटिव्ह आल्यामुळे पर्याय नाही. पॉझिटिव्ह आलेले काही खेळाडू मैदानावर उतरण्यास वेळ लागू शकेल. अशा वेळी क्रमात लवचिकता आणणे गरजेचे असल्याचे रोहितने सांगितले.
Web Title: Rohit-Dravid's 'new innings' with India's 1000th match; The first ODI between India and West Indies today
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.