दुबई : इंग्लंड विरोधातील अहमदाबादमध्ये कमी धावसंख्येच्या कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्मा याने आयसीसीच्या रविवारी जाहीर झालेल्या रँकिंगमध्ये सहा स्थानांनी झेप घेतली आहे. तो आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम आठव्या स्थानावर पोहचला आहे. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ६६ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात नाबाद २५ धावा केल्या. त्यासोबतच आयसीसीने म्हटले आहे की, आता मालिका संपल्यावर रँकिंग जाहीर होण्याऐवजी मार्चपासून दर अठवड्याला रँकिंग जाहीर होणार आहे.
भारतीय संघाने हा कसोटी सामना दोन दिवसांतच दहा गड्यांनी जिंकला होता. रोहित शर्मा हा संघ सहकारी पुजारापेक्षा दोन स्थानांनी पुढे आहे. त्याचे रेटिंग ७४२ आहे. फिरकीपटूंनी या सामन्यात शानदार कामगिरी केली. आर. अश्विननेदेखील रँकिंगमध्ये सुधारणा केली आहे. तर अक्षर पटेल याने ३० स्थानांनी मोठी उडी घेतली आहे. तो ३८ व्या स्थानी आहे. तर सात बळी घेणाऱ्या आर. अश्विननेदेखील चार स्थानांनी झेप घेतली आहे. तो आता तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडचा फिरकीपटू जॅक लिच हा पहिल्यांदाच अव्वल ३०मध्ये पोहचला आहे. कसोटी चार बळी घेतल्यावर तो २८व्या तर पहिल्यांदाच पाच बळी घेणारा कर्णधार जो रुट हा गोलंदाजांच्या यादीत ७२व्या स्थानी आहे. रुट अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत १३व्या स्थानी आहे. जॅक क्रॉले हा ४६व्या स्थानी आहे.
गणनेवर परिणाम नाहीआयसीसीने म्हटले आहे की, पुरुष आणि महिला खेळाडूंच्या रँकिंगमध्ये मार्च २०२१पासून दर आठवड्यातील कामगिरीच्या आधारावर जाहीर केली जाणार आहे. हा बदल रँकिंगच्या गणनेवर परिणाम करणार नाही. त्याचा अर्थ आहे की, रँकिंगला मालिका संपल्यावर जाहीर करण्या ऐवजी साप्ताहिक पद्धतीने जारी केले जाईल. त्यात जो सामना सुरू आहे. त्यातील कामगिरीचा समावेश केला जाणार नाही.’