बंगळुरु : भारताचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रिहॅबिलिटेशन (दुखापतीतून सावरण्याची प्रक्रिया) सुरू झाले आहे. दोघांनाही दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. भारताचा १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार यश धुल याने सोशल मीडियावर दोन्ही खेळाडूंसोबतचे एनसीएमधील फोटो अपलोड केले. १९ वर्षांखालील भारताचा संघ सध्या एनसीएमध्ये असून त्यांना २३ डिसेंबरपासून यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळायची आहे.
गेल्याच आठवड्यात रोहितला विराट कोहलीच्या जागी एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नेमले. शिवाय २६ डिसेंबरपासून रंगणाऱ्या कसोटी मालिकेसाठी त्याची उपकर्णधारपदी निवडही झाली होती. मात्र, मुंबईतील सराव सत्रादरम्यान पायाचे स्नायू दुखावल्याने त्याला ऐनवेळी कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली होती.
या दुखापतीतून सावरण्यासाठी रोहितला किमान ३-४ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो. दुसरीकडे, जडेजा गुडघ्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला आहे. त्याला पूर्णपणे ठीक होण्यासाठी मोठा कालावधी लागेल.