Rohit Sharma trade to CSK ( Marathi News ) - हार्दिक पांड्याचे गुजरात टायटन्सकडून पुन्हा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात येणे.... त्यानंतर काही दिवसांत रोहित शर्माकडून कर्णधारपद हार्दिककडे सोपवण्याचा निर्णय होतो.. या सर्वाने मुंबई इंडियन्सचे चाहते प्रचंड संतापले, नाराज झाले आहेत. ज्या रोहित शर्माने MI ला आयपीएलची पाच जेतेपदं जिंकून दिली, त्याच्याशी अशी वागणुक चाहत्यांना मान्य नाही. त्यामुळेच रोहितने आता दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळावे, अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यात रोहितसाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात ट्रेडिंग सुरू असल्याच्या चर्चा सुरू होत्या. या चर्चांवर अखेर MI व CSK फ्रँचायझीकडून मोठे अपडेट्स हाती लागले आहेत.
रोहित शर्माचा संघातील रोल काय? चाहत्यांचा राग समजू शकतो, पण...! माहेला जयवर्धनेचं मोठं विधान
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी मंगळवारी दुबईत लिलाव पार पडला. मुंबई इंडियन्सने गेराल्ड कोएत्झी ( ५ कोटी), नुवान तुषारा ( ४.८० कोटी), दिलशान मदुशंका ( ४.६० कोटी), मोहम्मद नबी ( १.५० कोटी), श्रेयस गोपाल ( २० लाख), शिवालिक शर्मा ( २० लाख), अंशुल कम्बोज ( २० लाख), नमन धीर ( २० लाख) यांना आपल्या ताफ्यात नव्याने दाखल करून घेतले. या लिलावानंतर मुंबईच्या एका अधिकाऱ्याला रोहितच्या ट्रेड बाबत विचारले केले.
''रोहित कुठेही जात नाही, आमच्या संघातील कोणताच खेळाडू कुठे जाणार नाही,''असे स्पष्ट मत त्याच्याकडून व्यक्त केले गेले. त्यांनी पुढे सांगितले की, ज्या काही बातम्या समोर येत आहेत, त्या चुकीच्या आहेत. मुंबई इंडियन्सचा एकही खेळाडू संघाला सोडून कुठेही चालला नाही किंवा आम्ही ट्रेडही करत नाही. संघातील सर्व खेळाडूंना विश्वासात घेऊनच कोणताही निर्णय घेता जातो. रोहितलाही या निर्णयाची कल्पना दिली होती आणि या निर्णयात त्याचाही सहभाग होता.
चेन्नई सुपर किंग्सनेही MI सोबतच्या ट्रेडचे वृत्त फेटाळले.चेन्नई सुपर किंग्सनेही मुंबई इंडियन्ससोबत कोणताही ट्रेड करण्याचा प्रयत्न सुरू नसल्याचे स्पष्ट केले. फ्रँचायझीचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी सांगितले की, "आम्ही तत्त्वानुसार खेळाडूंचा व्यापार करत नाही आणि आमच्याकडे मुंबई इंडियन्ससोबत व्यापार करण्यासाठी खेळाडूही नाहीत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला नाही आणि आमचा कोणताही हेतू नाही."