मेलबर्न : अॅडिलेड येथे पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पकड मिळवल्यानंतरही भारतीय संघाचा मानहानिकारक पराभव झाला. मात्र हा पराभव मागे ठेवून अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने जबरदस्त भरारी घेत पहिल्या पराभवाची व्याजासकट परतफेड केली आणि ऑस्ट्रेलियाला ८ गड्यांनी लोळवले. या कामगिरीनंतर या ‘अजिंक्य’ संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हिटमॅन’ रोहित शर्मा याने संघाचे ट्विटरद्वारे कौतुक केले. तो म्हणाला की, ‘एमसीजीवर भारताचा शानदार विजय. संपूर्ण सामन्यात खेळाडूंचा खेळ शानदार झाला.’ भारताला पहिले विश्वविजेतेपद मिळवून देणारे कर्णधार कपिलदेव यांनी म्हटले की, ‘भारतीय संघाला शुभेच्छा. ॲडिलेडमध्ये खराब क्रिकेट खेळल्यानंतर शानदार सामना. तुम्ही आम्हाला गौरवान्वित केले. अजिंक्य रहाणे तुझ्यावर आणि तुझ्या संघावर आम्हाला गर्व आहे. तुमच्या सोबत तुमचा कर्णधार नसला, तरी तू सर्वांना रस्ता दाखवला आहेेस. अशीच कामगिरी करत राहा. शानदार काम केलेस.’
एकीकडे भारतीय संघाचे कौतुक होत असताना, दुसरीकडे भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी संघाला संयम बाळगण्याचा सल्लाही दिला. बिशनसिंग बेदी यांनी सांगितले की, ‘३६ धावांवर पूर्ण संघ बाद होणे, भयानक अस्थिरतेचा अनुभव होता. पण, आता ८ गड्यांनी मिळवलेला विजय शानदार आहे. आशा आहे की भारतीय संघ आता ही दोन्ही कामगिरी विसरेल. एक वाईट स्वप्नासारखी कामगिरी होती, तर दुसरी यशाच्या शिखरावर पोहोचण्यासारखी होती. अजूनही दोन कसोटी सामने बाकी आहेत. टीम इंडियाने आपल्या कर्णधाराप्रमाणे शांतचित्त राहावे. तसेच ऑस्ट्रेलियाला पुढे कसे नमवावे याचा विचार करावा.’
Web Title: Rohit, Kapil, Bedi praised 'Ajinkya' Rahane Team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.