ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना २७ जून रोजी गयाना येथे होणार आहे. यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे. पण, या सामन्यात पाऊस व्यत्यय आणू शकतो. सेमीफायनल सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माला सूर गवसला आहे, तर विराट कोहलीची बॅट अजूनही शांत आहे. त्यावरूनच भारताचे वर्ल्ड कप विजेते कर्णधार कपिल देव यांनी रोहित आणि विराटचे नाव घेत मोठे वक्तव्य केले आहे.
१९८३ चा वन डे वर्ल्ड कप जिंकणारे भारताचे चॅम्पियन कर्णधार कपिल देव एबीपी न्यूजशी बोलताना म्हणाले की, रोहित शर्मा विराट कोहलीप्रमाणे कधीही उड्या मारत नाही आणि त्याला त्याच्या मर्यादा माहित आहेत. मला वाटते की रोहित शर्माला त्याचा खेळ आणि त्याला काय करायचे आहे, हे माहित आहे. रोहितपेक्षा चांगला कोणी नाही. अनेक मोठे खेळाडू येतात आणि स्वत:साठी खेळतात. पण, रोहित एक पाऊल पुढे आहे, तो संपूर्ण संघाला सोबत घेऊन जातो आणि संघातील सर्व खेळाडू त्याच्यावर खूश असतात.