रोहित शर्माने इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून कार्यभार स्वीकारल्याला आयपीएल २०२३मध्ये दहा वर्षे पूर्ण होत आहेत आणि या दहा वर्षांत तो पाच विजेतेपदांसह स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आयपीएलच्या १६व्या पर्वाला सुरूवात होण्यापूर्वी रोहितने फ्रँचायझीसोबत त्याच्या दीर्घ प्रवासाबद्दल सांगितले आणि या सहवासातील प्रत्येक क्षण आवडता असल्याचे त्याने म्हटले. ''१०वर्ष हा मोठा काळ आहे. साहजिकच १० वर्षात तुम्ही खूप आठवणी निर्माण करता. त्यातला प्रत्येक क्षण मी नक्कीच एन्जॉय केला आहे. तुम्ही मला एखादी आवडती आठवण सांगायला सांगितल्यास, मी ते करू शकणार नाही कारण ते कठीण आहे,''असे रोहित म्हणाला.
महेंद्रसिंग धोनीची अखेरची आयपीएल? रोहित शर्माचं मोठं विधान; म्हणाला, हे तर मी...
२०११च्या मोसमात पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एक तरुण खेळाडू म्हणून सामील झाल्यानंतर, रोहितने पाच विजेतेपदात संघाचे नेतृत्व केले आहे. २०१३ च्या स्पर्धेत त्याने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली आणि पहिल्याच वर्षात संघाला विजेतेपद मिळवून दिले. ''गेल्या काही वर्षांत आम्ही खूप चांगले क्रिकेट खेळलो आहोत. या संघासोबतचा माझा अनुभव अभूतपूर्व आहे. या संघाने मला प्रथम खेळाडू म्हणून आणि नंतर कर्णधार म्हणून स्वतःचे कौशल्य दाखवण्याची आणि व्यक्त होण्याची उत्तम संधी दिली आहे. एक व्यक्ती म्हणून आणि या संघाचा एक कर्णधार म्हणून माझ्यात नक्कीच प्रगती झाली आहे. मुंबई इंडियन्सने मला स्वतःला वेगळ्या अवतारात दाखवण्याची एक उत्तम संधी दिली आहे,” फ्रँचायझीसोबतच्या त्याच्या दीर्घ आणि यशस्वी नात्याबद्दल बोलताना रोहित म्हणाला.
बहुतेक देशांतर्गत भारतीय खेळाडू प्री-सीझन कॅम्पचा भाग असताना, गेल्या काही दिवसांपासून परदेशी आणि भारतीय खेळाडू संघात सामील झाले आहेत. प्रथमच संघाचे प्रशिक्षक असलेले मार्क बाऊचर म्हणाले की, संघ आता दोन सराव सामने खेळेल कारण सर्व खेळाडू संघासोबत आहेत. पुढील हंगामासाठी संघाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. ''आज रात्री आम्ही दुसरा सराव सामना खेळणार आहोत, त्यामुळे आम्ही संघ म्हणून कुठे आहोत आणि आम्ही काय साध्य करू शकतो याची आम्हाला चांगली कल्पना येईल. त्याशिवाय, आमची सर्व तयारी योजनेनुसार सुरू आहे, ” असेही ते म्हणाले.
रोहितने प्री-सीझन शिबिराचे महत्त्व सांगितले. तो म्हणाला, “आम्ही स्थानिक, देशांतर्गत भारतीय खेळाडूंचा खेळ फारसा पाहिलेला नसतो, म्हणूनच यातील काही खेळाडूंना खेळ समजून घेण्यासाठी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आम्ही प्री-सीझन कॅम्प आयोजित करतो. अनेक खेळाडू या संघाचा एक भाग आहेत, आम्ही त्यांना आता चांगले ओळखतो. नवीन नियमांची सांगड घालण्यासाठी आणि तुमच्या सर्वोत्तम खेळाडूंना मैदानावर उतरवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.”
सीझनसाठी संघाच्या ध्येयाबद्दल विचारले असता, प्रशिक्षक बाउचर यांचे जोरदार उत्तर होते,"ट्रॉफी जिंकण्याचे."
रोहितने स्पष्ट केले की संघाने स्पर्धेत टप्प्याटप्प्यानुसार विचार करण्यावर आणि विजयी होण्यासाठी अल्प-मुदतीची लक्ष्ये निश्चित करण्यावर कसा भर दिला आहे. “नक्कीच ट्रॉफी जिंकणे हे अंतिम ध्येय आहे, पण तिथे जाण्यासाठी आम्हाला बर्याच गोष्टी कराव्या लागतील. आयपीएल ही खूप मोठी स्पर्धा आहे, ती जवळपास दोन महिने चालते आणि ती ट्रॉफी जिंकण्यासाठी तुम्हाला १६-१७ सामने खेळावे लागतील. त्यासाठी काय आवश्यक आहे, हे आम्हाला समजते. स्पर्धेचे दोन भाग किंवा तीन भाग पाडणे आणि आम्ही कुठे उभे आहोत हे पाहणे आणि तेथून गोष्टी पुढे नेणे हे स्पष्टपणे संघाचे लक्ष्य असेल,”असे रोहितने सांगितले.
बाऊचर म्हणाले की मुंबई इंडियन्सच्या सेटअपमध्ये त्यांचे एकत्रीकरण अखंडपणे झाले आहे. “आतापर्यंत खूप चांगला प्रवास राहिला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षण देणे हे पूर्णपणे वेगळे आहे. मला घरी जास्त वेळ घालवायला मिळतो, जे छान आहे. मुंबई इंडियन्सने दाखवलेली व्यावसायिकता आणि तपशिलाकडे लक्ष देणे हे अनुकरणीय आहे. सहाय्यक कर्मचारी देखील विलक्षण आहेत. मला चांगले माहित आहे की मला निकाल देणे आवश्यक आहे आणि आशा आहे, की आम्ही ते मिळवू शकू. मी स्वतःला उच्च दर्जा सेट केला आहे आणि खेळाडूंसाठीही तेच असेल. मी येथे तिसरे किंवा चौथे स्थान मिळविण्यासाठी नाही, मी येथे जिंकण्यासाठी आलो आहे. मला जे हवे आहे ते सर्व मला दिले गेले आहे, त्यामुळे त्या दृष्टीकोनातून ते खूप चांगले आहे.”
मुंबई इंडियन्स २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आयपीएल २०२३तील मोहिमेला सुरुवात करणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Rohit (on his journey with MI so far): "I have enjoyed each & every moment with this team & been given great opportunities. I've grown as a player & an individual."
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.