नवी दिल्ली : आयपीएलदरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या भारतीय संघामध्ये रोहित शर्माची निवड न झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी रोहितचा समावेश केवळ कसोटी संघात करण्यात आला. मात्र यामागचे कारण स्पष्ट करताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले की, ‘रोहित शर्मा अद्याप केवळ ७० टक्केच तंदुरुस्त आहे.’
ज्यावेळी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली, तेव्हा रोहित मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये फलंदाजी करत होता. त्यामुळे नक्की त्याची तंदुरुस्ती कितपत गंभीर आहे, याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केल्या. शिवाय, टी-२०, एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलेली असतानाही रोहितला का डावलले जात आहे, याबाबतही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.
आयपीएलनंतर रोहित शर्माचा अपवाद वगळता भारतीय संघातील सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहचले असून रोहित मुंबईला परतला असून तो दिवाळीनंतर बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाणार आहे. आता रोहितच्या तंदुरुस्तीबाबत गांगुली यांनी माहिती दिली आहे. गांगुली यांनी केवळ एका वाक्यात रोहितच्या तंदुरुस्तीबाबत सांगितले की, ‘रोहित अजून केवळ ७० टक्केच तंदुरुस्त आहे.’ गांगुली पुढे म्हणाले की, ‘तंदुरुस्तीचा प्रश्न तुम्ही थेट रोहितलाच का नाही विचारत? तो अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही, यासाठीच त्याला एकदिवसीय आणि टी-२० संघात स्थान दिले नाही. त्याचा समावेश कसोटी संघात करण्यात आला आहे.’
मुंबई विरुद्ध पंजाब आयपीएल सामन्यात रोहितच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. यानंतर तो चार सामन्यांना मुकला. परंतु, लीगमधील अखेरच्या तीन सामन्यांत तो मैदानावर आला. दिल्लीविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात त्याने शानदार अर्धशतक झळकावून मुंबईला पाचवे आयपीएल जेतेपद पटकावून दिले.