रांची : कर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या विक्रमी शतकी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडला ७ गड्यांनी नमवले. या शानदार विजयासह भारतीय संघाने तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. मालिकेतील अखेरचा सामना रविवारी कोलकाता येथे खेळविण्यात येईल.
स्फोटक सुरुवात केलेल्या न्यूझीलंडला २० षटकांत ६ बाद १५३ धावांत रोखल्यानंतर भारताने १७.२ षटकांत ३ बाद १५५ धावा काढत सहज बाजी मारली. राहुलने पहिल्या सामन्यातील अपयश मागे टाकत ४९ चेंडूंत ६५ धावा काढताना ६ चौकार व २ षटकार मारले. कर्णधार रोहितनेही त्याला शानदार साथ देत ३६ चेंडूंत १ चौकार व ५ षटकार ठोकताना ५५ धावा केल्या. दोघांनी ११७ धावांची जबरदस्त सलामी देत भारताचा विजय निश्चित केला. दोघे बाद झाल्यानंतर ॠषभ पंत (१२*) आणि व्यंकटेश अय्यर (१२*) यांनी भारताचा विजय साकारला. न्यूझीलंडकडून तिन्ही बळी कर्णधार टिम साऊदीने घेतले.त्याआधी, मार्टिन गुप्टिल व डेरिल मिशेल यांनी स्फोटक सुरुवात करून दिल्यानंतरही न्यूझीलंडची वाटचाल मर्यादित धावसंख्येत रोखली गेली. भारतीयांनी पॉवर प्लेनंतर शानदार पुनरागमन करत किवींच्या फटकेबाजीवर अंकुश लावला. आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने २५ धावांत २ बळी घेतले. भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
गुप्टिलने डावातील पहिल्या दोन चेंडूंवर चौकार मारत आपले इरादे स्पष्ट करताना भुवनेश्वर व चहर यांच्यावर हल्ला चढवला. त्याने १५ चेंडूंत ३१ धावांचा तडाखा दिला. डेरील मिशेलनेही २८ चेंडूंत ३१ धावा काढल्या. दोघांनी १० च्या धावगतीने फटकेबाजी केली. दोघे बाद झाल्यानंतर किवींची धावगती मंदावली. मात्र, ग्लेन फिलीप्सने २१ चेंडूंत ३४ धावा फटकावत १ चौकार व ३ षटकारांसह संघाच्या धावगतीला वेग देण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेमध्ये ६४ धावा कुटताना न्यूझीलंडने ८ चौकार व २ षटकार ठोकले. मात्र, यानंतर ७ ते ११ षटकांमध्ये किवींना केवळ एक चौकार मारता आला. आघाडीच्या चार फलंदाजांचा अपवाद वगळता किंवींकडून इतर कोणाला छाप पाडता आली नाही.
न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल झे. पंत गो. चहर ३१, डेरील मिशेल झे. सूर्यकुमार गो. हर्षल ३१, मार्क चॅपमन झे. राहुल गो. अक्षर २१, ग्लेन फिलिप्स झे. गायकवाड गो. हर्षल ३४, टिम सीफर्ट झे. भुवनेश्वर गो. अश्विन १३, जेम्स नीशाम झे. पंत गो. भुवनेश्वर ३, मिशेल सँटनर नाबाद ८, अॅडम मिल्ने नाबाद ५. अवांतर - ७. एकूण : २० षटकांत ६ बाद १५३ धावा. बाद क्रम : १-४८, २-७९, ३-९०, ४-१२५, ५-१३७, ६-१४०.
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ४-०-३९-१; दीपक चहर ४-०-४२-१; अक्षर पटेल ४-०-२६-१; रविचंद्रन अश्विन ४-०-१९-१; हर्षल पटेल ४-०-२५-२.