नवी दिल्ली: चार वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरे द्विशतक झळकावले होते. 13 डिसेंबर 2017 रोजी पंजाबमधील मोहाली येथे झालेल्या सामन्यात रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 208 धावा केल्या होत्या. यासह हिटमॅन रोहित शर्माने स्वतःचा विश्वविक्रम आणखी मजबूत केला होता, कारण एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकापेक्षा जास्त द्विशतक झळकावणारा रोहित एकमेव खेळाडू आहे.
रोहितकडे होते संघाचे नेतृत्वत्या सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता आणि कर्णधार म्हणून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोच्च खेळी होती. त्याच्या आधी वीरेंद्र सेहवागने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 219 धावा करत द्विशतक झळकावले होते. रोहित शर्माने कर्णधार म्हणून श्रीलंकेविरुद्ध 13 चौकार आणि 12 षटकारांसह नाबाद 208 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात भारताने निर्धारित 50 षटकांत 4 गडी गमावून 392 धावांचा डोंगर उभारला होता.
393 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेला 50 षटके खेळूनही 251 धावाच करता आल्या आणि 141 धावांनी सामना गमावला. विराट कोहली या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी उपलब्ध नव्हता, कारण त्याने 11 डिसेंबर 2017 रोजी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्न केले होते. अशा स्थितीत या संपूर्ण मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार होता आणि पहिला सामना वाईट पद्धतीने गमावल्यानंतरही भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली होती.
रोहितच्या नावावर विश्वविक्रम
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा रोहित शर्मा हा जगातील एकमेव फलंदाज आहे. याशिवाय तो एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज आहे. त्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 264 धावांची खेळी खेळली आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले द्विशतक मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केले होते. ग्वाल्हेरच्या कॅप्टन रुपसिंग स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 200 धावा कुटल्या होत्या.