Join us  

Rohit Sharma Records, IND vs NZ 1st Test: रोहित शर्माचे फक्त ५ षटकार अन् बनणार भारताचा 'सिक्सर किंग'; या दिग्गजाचा विक्रम धोक्यात

Rohit Sharma Test Records, IND vs NZ 1st Test: भारताची उद्यापासून न्यूझीलंडविरूद्ध रंगणार ३ सामन्यांची कसोटी मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 5:01 PM

Open in App

Rohit Sharma Test Records, IND vs NZ 1st Test: टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवले. तर दुसरीकडे न्यूझीलंडला मात्र श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. आता उद्यापासून भारत-न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. मालिकेतील पहिला सामना १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्याला तर तिसरा सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला भारताचा सिक्सर किंग बनण्याची मोठी संधी आहे.

बांगलादेश विरूद्ध भारतीय कर्णधार रोहित शर्माने अप्रतिम नेतृत्वकौशल्य दाखवले. पण त्याला फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नाही. पहिल्या कसोटीमध्ये रोहितने ६ आणि ५ धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्यात २३ आणि ८ धावा केल्या. रोहित चारही डावांमध्ये अपयशी ठरला. पण या मालिकेत त्याला धावा करणे आवश्यक आहे. त्यासोबतच रोहितकडे भारताचा कसोटी सिक्सर किंग बनण्याचीही चांगली संधी आहे. रोहित शर्माने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ८७ षटकार लगावले आहेत. भारताकडून कसोटीमध्ये सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या वीरेंदर सेहवागच्या नावे ९१ षटकार आहेत. त्यामुळे रोहित या सामन्यात किंवा मालिकेत ५ षटकार मारुन सिक्सर किंग बनू शकतो.

दरम्यान, रोहितला या मालिकेत आणखी एक विक्रमही खुणावतोय. भारतीय संघ जर न्यूझीलंड विरुद्ध तीनही सामने जिंकला, तर रोहित शर्मा विराट कोहलीला मागे टाकेल. भारताचा कसोटी कर्णधार असताना विराट कोहलीने एकूण २२ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी त्याने १४ सामने जिंकले, ७ सामने गमावले तर १ सामना अनिर्णित राहिला. रोहित शर्मा कसोटीचा कर्णधार झाल्यापासून त्याने आतापर्यंत १८ सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यापैकी त्याने १२ सामने जिंकले असून ४ सामने गमावले तर २ सामने अनिर्णित राहिले. जर भारताला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत तीनही सामने जिंकता आले, तर कर्णधार म्हणून रोहित शर्मा १५ कसोटी सामने जिंकेल आणि विराट कोहलीला मागे टाकेल.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडरोहित शर्माविरेंद्र सेहवागभारतीय क्रिकेट संघ