आयपीएलच्या १६ व्या हंगामाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी पुन्हा एकदा जिंकून विजेतेपदांचा षटकार ठोकण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र हंगामाच्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आधीच संघाबाहेर आहे. त्यातच आज कर्णधारांच्या एकत्रित फोटोशूटला कर्णधार रोहित शर्मा प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहिल्याने मुंबईच्या गोटात धाकधूक वाढली आहे. तो मुंबईच्या सलामीच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
रोहित शर्माची प्रकृती ठिक नसल्याने तो आज झालेल्या कॅप्टनच्या फोटोशूटला उपस्थित राहू शकला नाही. मात्र तो मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा २ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणार आहे. या सामन्यात मुंबईच्या संघाला बंगळुरूकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात स्टार गोलंदाज जसप्रित बुमराहच्या अनुपस्थितीची कसर भरून काढण्याचं आव्हान मुंबईसमोर असेल. तसेच रोहित शर्मालाही आपल्या बॅटने पराक्रम गाजवावा लागणार आहे. गेल्या काही काळात त्याने धावा जमवल्या असल्या तरी त्याला मोठी खेळी कऱण्यात अपयश आले आहे. तसेच आयपीएलच्या गेल्या हंगामात रोहित शर्माला एकही अर्धशतक फटकावता आले नव्हते. त्यामुळे रोहितवर चांगली कामगिरी करण्यासाठी दबाव असेल.
मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, टिम डेव्हिड, रमनदीप सिंह, तिलक वर्मा, पीयूष चावला, ईशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, डेवॉल्ड ब्रेविस, जोफ्रा आर्चर, अर्जुन तेंडुलकर, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकिन, जेसन बेहनडॉर्फ, ड्युन जॉन्सन, विष्णू विनोद, शम्स मुलाणी, नेहल वढेरा, राघव गोयल, झे रिचर्डसन आणि आकाश माधवाल.