दुबई: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून दारुण पराभव स्वीकारल्यानंतर अखेर भारतानं विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानला धूळ चारत भारतानं स्पर्धेतील पहिलावहिला विजय नोंदवला. यामुळे भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. मात्र भारताचं स्पर्धेतील आव्हान आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. भारतीय संघावर ही वेळ का आली, याबद्दल उपकर्णधार रोहित शर्मानं सामन्यानंतर भाष्य केलं. संघाचं नेमकं काय चुकलं यावर रोहित पत्रकार परिषदेत बोलला.
गेल्या २ महिन्यांपासून संघातील खेळाडू सातत्यानं खेळत आहेत. त्यांना अजिबात विश्रांती मिळालेली नाही. त्यामुळेच दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानं संघाला सूर गवसला असल्याचं रोहितनं सांगितलं. अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा दृष्टीकोन वेगळा होता. आधीच्या दोन सामन्यांमध्येही असाच दृष्टीकोन असायला हवा होता. पण तुम्ही बराच वेळ खेळत असता, तेव्हा असं घडतं. काही वेळा निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. पहिल्या दोन सामन्यांत तेच घडलं, असं रोहित म्हणाला.
भारतीय खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळाली नसल्याचा मुद्दा काही दिवसांपूर्वी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं म्हटलं होतं. तोच धागा पकडत रोहितनं गेल्या अनेक महिन्यांमधील वेळापत्रकाचा उल्लेख केला. टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा सामना, इंग्लंड दौरा आणि आयपीएल खेळून आले. योग्य निर्णय घेण्यासाठी तुमचं मन ताजंतवानं असणं गरजेचं असतं. मात्र सतत खेळत असल्यानं आम्ही कदाचित योग्य निर्णय घेऊ शकलो नाही. जेव्हा तुम्ही भरपूर क्रिकेट खेळता, तेव्हा अशा गोष्टी घडतात, असं रोहितनं सांगितलं.