- सौरव गांगुली लिहितात...
विराट कोहली अॅण्ड कंपनीसाठी नवे युग सुरू होत आहे. टी२० आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खिशात घातल्यानंतर आता आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा शुभारंभ होत आहे. कसोटी क्रिकेटला आणखी रोमहर्षक बनविण्याचा हा प्रयत्न असेल. कसोटी क्रिकेटची सुंदरता बघायची झाल्यास अॅशेस सामन्यावर नजर टाकायला हवी.विंडीज क्रिकेटमध्ये आधीसारखी उत्सुकता राहिलेली नाही. ही गोष्ट विश्वचषक व त्यानंतर भारताविरुद्ध झालेल्या मालिकेतून सिद्ध झाली. कॅरेबियन क्रिकेटसाठी ही परिवर्तनाची वेळ आहे. लारा म्हणतो, ‘संघबांधणी हा विषय केवळ गुणवत्ता व मेहनत यांच्यावर विसंबून नसून खेळाडूंचे विचारही महत्त्वपूर्ण ठरतात.’ कॅरेबियन क्रिकेटमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. पण भारताविरुद्ध खेळताना त्यांच्यात विजिगिषु वृत्तीचा अभाव जाणवला. काही महिन्याआधी याच संघाने इंग्लंडला त्यांच्या घरी लोळवून सर्वांचे लक्ष वेधले. तो विजय योग्यच होता हे सिद्ध करण्याची आता वेळ आली आहे.कसोटीत आॅस्ट्रेलिया व इंग्लंडविरुद्ध शानदार कामगिरी करणाऱ्या रिषभ पंतला रिद्धिमान साहापेक्षा सरस ठरण्याची चांगली संधी असेल. रवींद्र जडेजा अष्टपैलूत्व सिद्ध करू शकतो. इशांत व बुमराह यांचे स्थान निश्चित आहे. योग्यतेच्या आधारे मी भुवनेश्वरच्या तुलनेत शमीला झुकते माप देईन. फिरकीपटू अश्विन पहिली पसंती असेल.भारतासाठी सर्वात मोठा प्रश्न रोहित- रहाणे यांच्या खेळण्याविषयी असेल. द. आफ्रिकेत अशीच काहीशी स्थिती होती. विश्वचषकात रोहित फॉर्ममध्ये होता. पण द. आफ्रिका आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध तो ‘आॅफ फॉर्म’ जाणवला. रहाणेने द. आफ्रिकेत मोलाचे योगदान दिले. आॅस्ट्रेलियात मात्र तो देखील फ्लॉप ठरला होता. माझ्यामते सध्या रोहितला सलामीला खेळवावे. मधल्या फळीला आकार देण्यासाठी रहाणेचा उपयोग करून घेण्यास हरकत नाही. (गेमप्लान)