Rohit Sharma, Champions Trophy 2025 : आजपासून भारताची इंग्लंड विरूद्ध टी२० मालिका सुरु होत आहे. त्यानंतर १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेआधी रोहित शर्मा देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रणजी करंडक स्पर्धेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट संघात खेळणार आहे. मुंबई विरूद्ध जम्मू काश्मीर यांच्यातील लढतीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने संघाची घोषणा केली असून यात रोहित शर्मासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत निवड झालेल्या श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वालचीही निवड करण्यात आली आहे. रोहित रणजी खेळणार असल्याने तब्बल १७ वर्षांनी एक योगायोग जुळून येणार आहे.
१७ वर्षांनी पुन्हा घडणार असा प्रकार
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा रणजी क्रिकेट स्पर्धेत खेळणार हे जवळपास निश्चितच आहे. भारतीय संघाचा कसोटी कर्णधार असताना रणजी स्पर्धा खेळण्याचा योग तब्बल १७ वर्षांनी जुळून येणार आहे. याआधी अनिल कुंबळेच्या बाबतीत असा प्रकार घडला होता. २००७ साली कुंबळे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होता. त्याचवेळी त्याने हिमाचल प्रदेश संघाकडून रणजी क्रिकेट खेळले. त्यावेळी राहुल द्रविडनेही रणजी क्रिकेट खेळले होते.
तब्बल १० वर्षांनी रणजी मॅच खेळणार रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार मागील काही दिवसांपासून सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कॅप्टन असून त्याला बाकावर बसण्याची वेळ आली. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत ५ डावात त्याने फक्त ३१ धावा काढल्या. भारतीय संघाच्या पराभवातील खलनायकांपैकी तो एक होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाच्या पराभवानंतर बीसीसीआयने वरिष्ठ खेळआडूंसाठी कठोर निर्णय घेतले आहेत. त्यात सर्व खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळावे, या नियमावर जोर दिला आहे. त्यामुळेच आता तब्बल १० वर्षांनी रोहित शर्मा रणजी मॅच खेळताना दिसणार आहे. याआधी रोहित शर्मानं २०१५ मध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध अखेरचा रणजी सामना खेळला होता.