नवी दिल्ली : भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाच्या आपल्या सलामीच्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारून विजयी सलामी दिली आहे. भारताने ४ गडी राखून पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. किंग कोहलीने केलेल्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर भारताला विजय मिळवण्यात यश आले. भारताने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या यांच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचे फलंदाज चितपट झाले. तरीदेखील पाकिस्तानने भारतासमोर १६० धावांचे आव्हान ठेवले.
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची देखील निराशाजनक सुरूवात झाली होती. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या दोघांनाही चांगली सुरुवात करता आली नाही. नसीम शाहच्या चेंडूवर राहुल बाद झाला. त्यानंतर लगेचच भारतीय कर्णधार रोहित शर्मा देखील हारिस रौफचा शिकार झाला. याचाच दाखला देत पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने रोहित, राहुल जोडीवर निशाणा साधला आहे.
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्यासह अक्षर पटेल आणि सूर्यकुमार यादव यांना देखील पाकिस्तानी गोलंदाजीचा सामना करता आला नव्हता. यामुळेच भारतीय संघाचे अवघ्या ३१ धावांवर ४ खेळाडू तंबूत परतले होते. दोन्ही भारतीय सलामीवीर टी-२० मध्ये खराब सुरुवातीमुळे चर्चेत आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून बोलताना भारताची सलामी जोडी काही दबावाखाली असून घाबरत खेळत असल्याचे म्हटले आहे.
रोहित, राहुल घाबरलेले दिसले - शोएब अख्तरशोएब अख्तरने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून बोलताना म्हटले, "भारतीय संघाच्या सलामी जोडीबद्दल भाष्य करायचे झाले तर ते दबावात खेळत असल्याचे पाहायला मिळाले. ते पाकिस्तानच्या गोलंदाजांना घाबरत होते. रोहित शर्माने कर्णधार म्हणून शांत डोक्याने खेळणे गरजेचे आहे." अशा शब्दांत अख्तरने पाकिस्तानी गोलंदाजांचे विशेष कौतुक केले.
किंग कोहलीची शानदार नाबाद खेळीपाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून भारतासमोर विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताची देखील सुरूवात निराशाजनक झाली होती. संघाच्या अवघ्या ३१ धावांवर ४ गडी बाद झाले होते. १८ चेंडूत विजयासाठी ४८ धावांची गरज असताना विराटने शानदार खेळी केली. अखेर हॅरीस रौफच्या १९व्या षटकात विराटने दोन खणखणीत षटकार खेचून १५ धावा जोडल्या. भारताला आता६ चेंडूंत १६ धावा हव्या होत्या. मोहम्मद नवाजच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने उत्तुंग फटका मारला, परंतु बाबरने झेल टिपला. हार्दिक ३७ चेंडूंत ४० धावांवर बाद झाला. ३ चेंडूंत १३ धावा हव्या असताना विराटने खणखणीत षटकार खेचला अन् हाईटमुळे तो नो बॉल ठरवला गेला. आता ३ चेंडूंत ६ धावाच करायच्या होत्या. फ्री हिटचा चेंडू नवाजने वाईड टाकला. फ्री हिटवर चेंडू स्टम्पवर आदळून फाईन लेगला गेला, परंतु विराट व दिनेश कार्तिकने ३ धावा पळून काढल्या. पाकिस्तानचे खेळाडू प्रचंड नाराज दिसले. डेड बॉलची मागणी करू लागले. २ चेंडू २ धावा हव्या होत्या आणि कार्तिक स्ट्राईकवर होता. पण, कार्तिक स्टम्पिंग झाला. १ चेंडू २ धावा असे असताना अश्विन स्ट्राईकवर होता. नवाजने Wide टाकला अन् सामना बरोबरीत आला. अश्विनने विजयी चौकार मारला आणि भारताने ४ गडी राखून सामना जिंकला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"