नवी दिल्ली - रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्या तडाख्यानंतर गोलंदाजांनी केलेल्या नियंत्रित मा-याच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्या टी-२० सामन्यात ५३ धावांनी लोळवले. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात पहिल्यांदाच भारताने किवी संघाला नमविण्याची कामगिरी केली. याआधी झालेल्या ६ टी-२० सामन्यांत न्यूझीलंडने ५ वेळा बाजी मारली असून एका सामन्याचा निर्णय लागला नव्हता. यासह विराट सेनेने अनुभवी गोलंदाज आशिष नेहराला विजयी निरोपही दिला.
तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या शिखर धवनने 52 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. स्फोटक फलंदाज रोहित शर्मानेही 55 चेंडूत 80 धावा केल्या. त्याने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 158 धावांची भागीदारी केली, जी आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात भारतीय संघाची आतापर्यंत कोणत्याही विकेटसाठी ठरलेली सर्वात्कृष्ट भागीदारी आहे.
शिखर धवन आणि रोहित शर्माने विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीरचा तो रेकॉर्ड तोडला आहे, जो त्यांनी 2007 रोजी इंग्लंडविरोधात खेळताना केला होता. त्यावेळी ओपनिंगला उतरलेल्या गंभीर आणि सेहवागने पहिल्या विकेटसाठी 136 धावांची रेकॉर्ड भागीदारी केली होती. रोहित शर्मा आणि शिखर धवनने 158 धावांची भागीदारी करत हा रेकॉर्ड तोडला आहे. पण टी-20 मध्ये सर्वात मोठी भागीदारी करण्याचा रेकॉर्ड अद्यापही न्यूझीलंडच्या विलियमसन आणि मार्टिन गुप्टिलच्या नावे आहे. दोघांनी 171 धावांची भागीदारी केली होती.
रोहित शर्मा बनला 'सिक्सर किंग'न्यूझीलंडविरोधातील आपल्या 80 धावांच्या खेळीदरम्यान रोहित शर्माने अजून एक रेकॉर्ड केला आहे. रोहित शर्मा भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये (आयपीएलसहित सर्व प्रकाराच्या टी-20 क्रिकेटमध्ये) सर्वाधिक षटकार लगावणार खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माने सुरेश रैनाचा रेकॉर्ड तोडला आहे. या सामन्याआधी रोहितच्या नावे 264 षटकारांची नोंद होती. आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान रोहित शर्माने चार छक्के लगावले, आणि षटकारांची संख्या 268 करत सिक्सर किंग बनला.
अनोखा रेकॉर्डया सामन्यात काही मजेशीर रेकॉर्डही झाले. दोन्ही सलामी फलंदाजांनी समान धावसंख्या केली. रोहित शर्मा आणि शिखर धवन दोघांनीही प्रत्येकी 80 धावा केल्या आणि आऊट झाले. टी-20 क्रिकेटमध्ये दोन्ही सलामी फलंदाजांनी समान धावसंख्या करण्याचा हा आतापर्यंतचा मोठा रेकॉर्ड आहे. याआधी 2010 मध्ये पाकिस्तानचे सलामी फलंदाज कामरान अकमल आणि सलमान बटने 73-13 धावा केल्या होत्या.