IPL 2025 : इंडियन प्रिमिअर लीग २०२५ च्या मोसमात मुंबई इंडियन्स संघात मोठा बदल होऊ शकतो.खेळाडूंची खरेदी, संघांना अधिकची रक्कम वाढवून देण्याचा निर्णय यासारख्या गोष्टींसह यावेळी मोठा लिलाव होणार आहे. याचसोबत मुंबई इंडियन्सच्या संघात मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे देण्यात आले होते. यावेळीही कदाचित कर्णधार पंड्याच कर्णधारपदी कायम राहील पण संघातील दोन मोठे खेळाडू रामराम ठोकू शकतात. आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीचा कणा असलले दोन स्फोटक फलंदाज संघ सोडणार असल्याची चर्चा सुरु आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघापासून दूर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का बसू शकतो. रोहित शर्मा आता संघाचा कर्णधार नाही, अशा परिस्थितीत इतर संघ त्याला कर्णधार बनवण्याचा विचार करू शकतात. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, या दोन्ही खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी इतर फ्रँचायजी प्रयत्न करत असल्या तरी कोलकाता नाईट रायडर्सकडून वाटेल ते प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.
आयपीएल २०२५ साठी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स सोडण्याची शकत्या आहे. दुसरीकडे केकेआर लिलावात या दोघांनाही टार्गेट करणार असल्याचे बोललं जात आहे. यावेळी आयपीएलमध्ये मेगा लिलाव होणार आहे. गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सची फारच अवस्था वाईट होती. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाची कामगिरी अत्यंत खराब होती. मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता. तसेच रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवण्यावरुन जोरदार विरोध देखील झाला होता. यावरुन हार्दिक पंड्याला मुंबईच्या चाहत्यांनी ट्रोल देखील केलं होतं.
आता रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडल्यास संघात मोठी पोकळी निर्माण होणार असून ती भरून काढणे सोपे ठरणार नाही. रोहित आणि सूर्या या दोघांचा स्वतःचा चाहता एक वर्ग आहे. या दोघांच्या जाण्याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नसलामुळे चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र असं असले तरी आगामी काळात आयपीएल लिलावात सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत.
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा कर्णधार म्हणून एका वेगळ्या पातळीवर गेला आहे. तर सूर्यकुमार यादव हा फटकेबाजीमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. त्यामुळेच इतर आयपीएलचे संघ दोघांना आपल्यासोबत घेण्यासाठी उत्सुक असल्याचे बोललं जातं.