भारतीय क्रिकेटचे जय-वीरू अर्थात विराट कोहली आणि रोहित शर्मा नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असतात. सध्या भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या स्पर्धेदरम्यान अनेकदा या जोडीचे एकमेकांप्रती असलेले प्रेम पाहायला मिळाले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी सामना पार पडला. २००३ नंतर प्रथमच भारताला आयसीसी इव्हेंटमध्ये किवींना पराभूत करण्यात यश आले. या ऐतिहासिक विजयानंतर विराट अन् रोहित यांनी घट्ट मिठी मारून विजयाचा आनंद साजरा केला. चाहत्यांनी कायमस्वरूपी डोळ्यात साठवून ठेवावे हे दृश्य अनेकांच्या मनात घर करून गेलं. अशातच आता किंग कोहली आणि हिटमॅन यांचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही दिग्गज एकाच गाडीतून प्रवास करताना दिसत आहे.
किंग आणि हिटमॅनचा सुहाना 'सफर'
दरम्यान, विराट आणि रोहित यांची मैत्री जगजाहीर आहे. किंग कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी विराट अनेकदा रोहितला सल्ले देताना दिसतो. भारतीय क्रिकेटचे जय-वीरू यंदा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवून तमाम भारतीयांचे स्वप्न पूर्ण करतील अशी चाहत्यांना आशा आहे. चालू विश्वचषकात यजमानांनी सुरूवातीचे पाचही सामने जिंकून विजयी 'पंच' मारला आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या विजयासह भारतीय संघ विश्वचषकाच्या क्रमवारीत (१० गुण) अव्वल स्थानी पोहचला.
२० वर्षांनंतर विजय मिळवण्यात रोहितसेनेला यश २० वर्षांचा दुष्काळ संपवून भारताने अखेर न्यूझीलंडला पराभूत करण्यात यश मिळवले. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना भारताने चांगली सुरूवात केली. पण, डॅरिल मिशेल (१३०) आणि रचिन रवींद्र (७५) यांनी यजमानांची डोकेदुखी वाढवली. अखेर निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २७३ धावा करून किवींनी भारतासमोर २७४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीरांनी स्फोटक सुरूवात केली. रोहित शर्मा (४६) आणि शुबमन गिल (२६) धावा करून तंबूत परतल्यानंतर विराट कोहलीने मोर्चा सांभाळला. त्याला श्रेयस अय्यरने (३३) चांगली साथ दिली. मात्र, अय्यर बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा नाबाद ३९ धावांची खेळी करून अखेरपर्यंत टिकून राहिला. सामन्याचा हिरो विराट कोहली मात्र त्याच्या शतकाला मुकला आणि (९५) धावांवर बाद झाला अन् 'विराट' खेळीच्या जोरावर भारताने ४ गडी आणि १२ चेंडू राखून विजय साकारला.