अहमदाबाद - भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये क्रिकेटच्या मैदानावर आज महायुद्ध होत असून अहमदाबाद स्टेडियममध्ये सकाळपासूनच चाहत्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याकडे जगाचे लक्ष लागलेले असते. दोन्ही देशातील चाहत्यांना हा सामन्यात विजयच हवा असतो. त्यामुळे, तितकाच दबाव संघावर आणि चाहत्यांवरही दिसून येतो. मात्र, वर्ल्डकप सामन्यांचा इतिहास पाहिल्यास भारताने आत्तापर्यंत ७ वेळा पाकिस्तानला मात दिलीय. त्यामुळे, भारत ८ व्यांदा विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
भारताने आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवत मैदानावर तिरंगा फडकवला आहे. आजच्या सामन्यातही टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्त्वात जिंकण्यासाठीच मैदानात उतरणार आहे. गत २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध अफलातून कामगिरी करणाऱ्या दोन दिग्गज फलंदाजांची आजही बॅट तपळेल, असा विश्वास चाहत्यांना आहे. कारण, २०१९ च्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माने पाकिस्तानची जबरदस्त धुलाई केली होती.
रोहित शर्माने ११३ चेंडूत १४० धावांची तडाखेबंद खेळी केली होती. तर, विराट कोहलीनेही ६५ चेंडूत ७७ धावांची फटकेबाजी केली होती. त्यामुळे, टीम इंडियाने ५० षटकांत ३३६ धावांचा डोंगर उभारत पाकिस्तानपुढे मोठे आव्हान दिले होते. विशेष म्हणजे भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची दयनीय अवस्था झाली होती. पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यात पाकिस्तानला ४० षटकांत ३०२ धावांचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानी संघाला ४० षटकांत केवळ २१२ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे, भारताने लकवर्थ लुईसच्या नियमानुसार हा सामना ८९ धावांनी जिंकला होता. विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर वाजत-गाजत विजय मिळवला होता. दरम्यान, या सामन्यात रोहित शर्माने मॅन ऑफ द मॅचचा खिताब जिंकला होता.
२०१९ च्या विश्वचषकातील सामन्याचा स्कोअरबोर्ड
भारत - ३३६/५ (५० षटके)पाकिस्तान - २१२/6 (४० षटके डकवर्थ लुईस नियम)
भारत ८९ धावांनी विजयी
रोहित शर्मा - १४० (११३ चेंडू)विराट कोहली - ७७ (६५ चेंडू)के.एल.राहुल - ५७ (७८ चेंडू)
गोलंदाजी
विजय शंकर - २२/२ हार्दीक पांड्या - ४४/२कुलदीप यादव - ३२/२