Join us

Video: "अबे सर में कुछ हैं?"; रोहित शर्मा Live सामन्यात आकाश दीपवर प्रचंड संतापला, काय घडलं?

Rohit Sharma Angry on Akash Deep, IND vs AUS 3rd Test Video: गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे कर्णधार रोहित शर्माची होणारी चिडचिड कॅमेऱ्यात कैद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:41 IST

Open in App

Rohit Sharma Angry on Akash Deep, IND vs AUS 3rd Test Video : ब्रिसबेन गाबा स्टेडियममध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने ५१ धावांच्या मोबदल्यात ४ बळी गमावले. वरच्या फळीतील फलंदाजांनी चाहत्यांची घोर निराशा केली. संघाने पन्नाशी गाठण्याआधीच यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली आणि रिषभ पंत तंबूत परतले. त्याआधी ऑस्ट्रेलियन संघाने मात्र भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ट्रेव्हिस हेड (१५२), स्टीव्ह स्मिथ (१०१) यांची शतके आणि अलेक्स कॅरीच्या (७०) अर्धशतकाच्या बळावर ४४५ धावा केल्या. या डावात बुमराह वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही. गोलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे कर्णधार रोहित शर्माची होणारी चिडचिड कॅमेऱ्यात देखील कैद झाली. सहसा मैदानात मजामस्तीच्या मूडमध्ये असणारा रोहित शर्मा नवखा गोलंदाज आकाश दीप याला चांगलाच झापताना दिसला.

ऑस्ट्रेलियाच्या संघाने एकूण ११७ षटके फलंदाजी केली. त्यामुळे भारतीय गोलंदाज आणि फिल्डर्सना चांगलाच घाम फुटला. तशातच ११४व्या षटकात एक प्रकार घडला. आकाश दीप गोलंदाजी करत असताना त्याने फुल लेंग्थ चेंडू टाकला. पण चेंडू खूपच वाईड पडला. चेंडू अडवण्यासाठी रिषभ पंतला खूप कष्ट घ्यावे लागले. मोठी उडी घेऊन त्याने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या हाताला लागून चेंडूचा वेग कमी झाला. अखेर चेंडू अडवून पुन्हा फेकेपर्यंत ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोन धावा केल्या. तसेच पंचांनी चेंडू वाईड दिला. घडलेल्या प्रकारावर रोहित शर्मा चांगलाच संतापला. "अबे सर में कुछ है" (तुला अक्कल आहे की नाही?) असे ओरडत रोहितने आपली नाराजी व्यक्त केली. या व्हिडीओदेखील सध्या व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा आकाश दीपवर संतापला, पाहा व्हिडीओ-

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. नॅथन मॅकस्वीनी (९) आणि उस्मान ख्वाजा (२१), मार्नस लाबूशेन (१२) तिघे स्वस्तात बाद झाले. ३ बाद ७५ या धावसंख्येनंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेव्हिस हेड यांची जोडी जमली. या दोघांनी तब्बल २४१ धावांची भागीदारी केली. स्मिथ १०१ धावांवर बाद झाला. ट्रेव्हिस हेडने फटकेबाजी सुरुच ठेवत १५२ धावा केल्या. त्यानंतर अलेक्स कॅरी यानेही ७० धावांची खेळी केली. या तीन बड्या खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ११७ षटके खेळली आणि ४४५ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने ७६ धावा देऊन ६ बळी घेतले.

४४५ धावांच्या मोठ्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामीला आले. यशस्वी जैस्वाल दुसऱ्याच चेंडूवर ४ धावा काढून बाद झाला. शुबमन गिल १ धाव काढून तंबूत परतला. विराट कोहलीही ३ धावांत माघारी परतला. पाठोपाठ रिषभ पंत ९ धावांवर बाद झाला. केएल राहुलने एका बाजू लावून धरली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा रोहित शर्मा (नाबाद ०) सोबत केएल राहुल (नाबाद ३३) पॅव्हेलियनमध्ये परतला. भारत सध्या ४ बाद ५१ धावसंख्येवर असून ३९४ धावांनी पिछाडीवर आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया