ICC Men’s T20I Team of the Year 2024 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०२४ या वर्षभरात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या टी२० संघाची घोषणा केली. रोहित शर्मा (Rohit Sharma) याला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२४ चा टी२० विश्वचषक जिंकला. वर्ल्डकप झाल्यावर लगेचच रोहितने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. पण तरीही त्याची गेल्या वर्षातील कामगिरी पाहता ICC ने त्याला बहुमान केला आहे.
जागतिक संघात कुणाचे किती खेळाडू?
आयसीसीने या टी२० संघात सर्वाधिक भारताच्या चार खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांची नावे आहेत. या संघात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, पाकिस्तान, झिम्बाब्वे, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज मधील प्रत्येकी एक-एक खेळाडूला स्थान मिळाले आहे.
रोहितने टीम इंडियाला जिंकून दिला टी२० विश्वचषक
रोहित शर्माने २०२४ च्या टी२० विश्वचषकात शानदार कामगिरी केली. त्याने तीन अर्धशतके झळकावली. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध ९२ धावांची आक्रमक खेळीही खेळली. त्याच्या फलंदाजीव्यतिरिक्त, रोहितने उत्तम नेतृत्वदेखील केले आणि भारतीय संघाला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रोहितने गेल्या वर्षी ११ टी२० सामन्यांमध्ये ४२ च्या सरासरीने ३७८ धावा केल्या.
'मॅचविनर' हार्दिक पांड्याही संघात
अष्टपैलू हार्दिक पांड्याचाही संघात समावेश आहे. त्याने गेल्या वर्षी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत आपली छाप पाडली. हार्दिकने २०२४ मध्ये भारतासाठी १७ टी२० सामन्यांमध्ये ३५२ धावा केल्या आणि १६ विकेट्स घेतल्या. २०२४ च्या टी-२० विश्वचषकातही हार्दिकने १४४ धावा केल्या आणि ११ विकेट घेतल्या. फायनलमध्ये मोक्याच्या क्षणी दोन विकेट्स घेत त्याने भारताला वर्ल्डकप मिळवून दिला.
जसप्रीत बुमराह - अर्शदीप सिंग जोडीला तोड नाही!
गेल्या वर्षी टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने शानदार पुनरागमन केले. भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणाऱ्या बुमराहने २०२४ च्या टी२० विश्वचषकात एकूण ८ सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, अर्शदीप सिंग २०२४ मध्ये टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता. त्याने गेल्या वर्षी १८ टी२० सामन्यांमध्ये ३६ बळी घेतले. अर्शदीपने विश्वचषकात आठ सामन्यांमध्ये १७ विकेट्स घेतल्या.
२०२४ चा आयसीसी टी२० संघ (ICC Men’s T20I Team of the Year 2024):
- रोहित शर्मा (कर्णधार), भारत
- ट्रेव्हिस हेड, ऑस्ट्रेलिया
- फिल सॉल्ट, इंग्लंड
- बाबर आझम, पाकिस्तान
- निकोलस पूरन (यष्टीरक्षक), वेस्ट इंडिज
- सिकंदर रझा, झिम्बाब्वे
- हार्दिक पांड्या, भारत
- राशीद खान, अफगाणिस्तान
- वानिंदू हसरंगा, श्रीलंका
- जसप्रीत बुमराह, भारत
- अर्शदीप सिंग, भारत
Web Title: Rohit Sharma appointed captain for ICC Mens T20I Team of the Year 2024 Jasprit Bumrah Hardik Pandya Arshdeep Singh
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.