India vs New Zealand : पुढील २४ तासांत न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० व कसोटी मालिकेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. विराट कोहली ( Virat Kohli) यानं ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून काल नामिबियाविरुद्ध अखेरचा सामना खेळला. आता ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाची माळ ही रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) गळ्यात जाणार हे निश्चित आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत रोहित टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. तीन ट्वेंटी-२० व दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाईल. त्यात विराट पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे वृत्त TOIनं दिले आहे.
विराटच्या अनुपस्थिती कसोटी संघाचे नेतृत्वही रोहितच सांभाळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर फॉर्माशी झगडणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे कसोटी संघाचे उप कर्णधारपद कायम राहिल, तर ट्वेंटी-२० संघाचे उप कर्णधारपद लोकेश राहुलकडे ( KL Rahul) जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जयपूर, रांची आणि कोलकाता येथे ट्वेंटी-२० सामने होतील, तर कानपूर व मुंबई येथे कसोटी सामने खेळवले जातील. ट्वेंटी-२० मालिकेत जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या सीनियर खेळाडूंना विश्रांती दिली जाईल.
वरुण चक्रवर्थीला बाकावर बसवून हर्षल पटेलला संधी दिली जाऊ शकते. हर्षलनं आयपीएल २०२१त दमदार कामगिरी करताना पर्पल कॅप नावावर केली आहे. दीपक व राहुल चहर हेही ट्वेंटी-२० संघात कायम राहतील. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची ही पहिली मालिका असणार आहे.
India vs New Zealand Schedule 2021
- पहिला ट्वेंटी-२०- १८ नोव्हेंबर, २०२१, जयपूर
- दूसरा ट्वेंटी-२० - १९ नोव्हेंबर, २०२१, रांची
- तिसरा ट्वेंटी-२० - २१ नोव्हेंबर, २०२१, कोलकाता
- पहिली कसोटी - २५ ते २९ नोव्हेंबर, कानपूर
- दुसरी कसोटी - ३ ते ७ डिसेंबर, मुंबई
न्यूझीलंडचा कसोटी संघ - केन विलियम्सन, टॉम ब्लंडल, डेव्हान कॉनवे, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिचेल सँटनर, विल समरविल, टीम साऊदी, रॉस टेलर, विल यंग, निल वॅगनर