मुंबई - लग्नासाठी सुट्टीवर जाण्याआधी विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वोत्तम प्रदर्शन केले. सलग द्विशतक झळकावत विराटने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला. आजच्या घडीला जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, ज्यो रुट आणि केन रिचर्डसन यांच्यापैकी कोण सर्वोत्तम फलंदाज आहे याची चर्चा रंगली आहे. पण इतकी दमदार कामगिरी करुनही संदीप पाटील यांना विराट कोहलीपेक्षा रोहित शर्मा जास्त सरस वाटतो.
मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट कोहली भारतीय संघातील सर्वोत्तम फलंदाज नाहीय. आजच्या तारखेला वनडेमध्ये विराट पेक्षा रोहित शर्मा चांगला फलंदाज असल्याचे मत संदीप पाटील यांनी व्यक्त केले. आपल्या काळात आक्रमक फलंदाज अशी ओळख असलेल्या संदीप पाटील यांनी भारतीय निवड समितीचे प्रमुखपदही भूषवले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये विराटच सर्वोत्तम फलंदाज आहे यात कुठलीही शंका नाही. पण वनडे आणि टी-20 मध्ये रोहितच विराटपेक्षा सरस आहे असे पाटील म्हणाले. संदीप पाटील यांचे हे व्यक्तीगत मत असले तरी ते विराटच्या चाहत्यांना अजिबात पटणार नाही. एबीपी न्यूजवर बोलताना पाटील यांनी हे मत व्यक्त केले. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा सध्या भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवत असून रोहितने संघाचे नेतृत्व करताना कुठेही कोहलीची उणीव जाणवू दिली नाही. स्वत: कर्णधारपदाला साजेशी खेळ करुन संघासमोर आदर्श ठेवला.
ताकद नव्हे तर टायमिंगवर अधिक भरमाझ्या मोठ्या खेळीचे रहस्य ताकद नव्हे तर अचूक टायमिंग आहे. मैदान पाहून अनुकूल खेळ करीत असल्यानेच धावा काढण्यात यशस्वी होतो, असे सलामीवीर आणि काळजीवाहू कर्णधार रोहित शर्मा याचे मत आहे. सर्वांत वेगवान टी-२० शतक झळकविल्यानंतर रोहित म्हणाला, ‘माझ्याकडे फटके मारण्यासाठी मोठी ताकद नाही, पण टायमिंग आहे. अचूक टायमिंगमध्येच फटके मारण्यास मदत होते. मैदान पाहून त्यानुसार मी खेळ करतो. मी ख्रिस गेलसारखा ‘पॉवर हिटर’ नसलो तरी अचूक टायमिंगच्या बळावर सहजपणे चौकार-षटकार ठोकू शकतो.’ रोहित हा वन-डेत तीन द्विशतके आणि टी-२० मध्ये शतक ठोकणारा एकमेव फलंदाज आहे.
35 चेंडूत शतक फटकावत केली टी-20मधील वेगवान शतकाच्या विक्रमाशी बरोबरीश्रीलंकेविरुद्ध इंदूरमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टी-20 लढतीत रोहितने चौकार-षटकारांची बरसात करत अवघ्या 35 चेंडूत शतकाला गवसणी घातली. त्याबरोबरच टी-20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतकाच्या विक्रमाशी बरोबरी साधली. आता आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील वेगवान शतकाचा विक्रम रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मीलरच्या नावे झाला आहे. तर टी-20 मध्ये सर्वात वेगवान शतक ख्रिस गेलच्या नावे आहे. त्याने आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळताना 30 चेंडूत शतक झळकावले होते.