लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: खराब फॉर्ममुळे सध्या टीकेचा धनी ठरत असलेल्या भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबईच्या रणजी क्रिकेट संघासोबत फलंदाजीचा सराव केला. यामुळे २३ जानेवारी होणाऱ्या जम्मू- काश्मीर विरुद्धच्या रणजी सामन्यात रोहित खेळणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर चषक मालिकेत तीन सामने खेळताना रोहितने केवळ ३१ धावा केल्या. तसेच, खराब फॉर्ममुळे त्याने स्वतःहून सिडनी येथे झालेल्या अखेरच्या पाचव्या कसोटीतून स्वतःला संघाबाहेर केले होते. मंगळवारी सकाळच्या सत्रात त्याने वानखेडे स्टेडियमवर मुंबई रणजी संघासोबत सराव केला. यावेळी, त्याच्यासह अजिंक्य रहाणेनेही चांगली फटकेबाजी केली. सरावादरम्यान रोहितने काही चांगले फटके खेळले.
मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) एका अधिकाऱ्याने सांगितले की, 'जेव्हा एखाद्या स्पर्धेत मोठे अंतर निर्माण होते, तेव्हा संघ व्यवस्थापनाकडून खेळाडूंच्या उपलब्धतेविषयी विचारणा होते. २३ जानेवारीला जम्मू-काश्मीरविरुद्धच्या रणजी चषक सामन्यासाठी संघ निवड होताना रोहितला खेळण्याबाबत विचारले जाईल.' रोहितने २०१५ मध्ये मुंबईकडून उत्तर प्रदेशविरुद्ध अखेरचा रणजी सामना खेळला होता.