Join us

आधी टीम इंडियात 'फ्लॉप', मग मुंबई संघात 'फेल'; अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय

Rohit Sharma Big Decision, Ranji Trophy : गेल्या काही महिन्यांपासून रोहित धावांसाठी धडपडताना दिसत होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 15:27 IST

Open in App

Rohit Sharma Big Decision, Ranji Trophy : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या वर्षभरापासून कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडताना दिसतोय. ऑस्ट्रेलियाच्या निराशाजनक दौऱ्यानंतर बीसीसीआयने कठोर भूमिका स्वीकारली. त्यामुळे रोहितसह अनेक बड्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागले. रोहित शर्माने तब्बल १० वर्षांनंतर रणजी क्रिकेट खेळले. मुंबईच्या संघाकडून खेळताना तो दोनही डावात फारशी चमक दाखवू शकला नाही. आधी भारतीय संघात आणि मग मुंबई रणजीमध्ये अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने अखेर नाईलाजाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

खराब कामगिरीनंतर रोहितचा मोठा निर्णय

रोहित शर्माने जम्मू-काश्मीरविरुद्ध रणजी सामना खेळला. या सामन्यातून कसोटीतील हरवलेला फॉर्म परत मिळवण्याचे त्याचे ध्येय होते. मात्र दोन्ही डावात तो फ्लॉप ठरला. त्याला या सामन्याच्या पहिल्या डावात केवळ ३ धावा तर दुसऱ्या डावात २८ धावा करता आल्या. अशा परिस्थितीत आता रोहितने इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा वनडे क्रिकेटवरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई रणजीतून त्याने आपले नाव मागे घेतले आहे.

निर्णयामागचे खरे कारण काय?

रोहित शर्मा आता यापुढे रणजी ट्रॉफी २०२४-२५ च्या पुढील फेरीत खेळणार नाही. मुंबई संघाचा पुढील सामना मेघालयशी ३० जानेवारीपासून होणार आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रोहितने इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीमुळे रणजी ट्रॉफीमध्ये यापुढे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्याने मुंबई संघ व्यवस्थापनालाही कळवले आहे. दुसरीकडे, यशस्वी जैस्वालही मुंबईच्या पुढील रणजी सामन्यात दिसणार नाही. इंग्लंडची मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तो भारतीय संघाचा एक भाग आहे. त्यामुळे तोदेखील भारतीय संघासोबतच सराव करताना दिसेल.

टॅग्स :रोहित शर्मारणजी करंडकभारतीय क्रिकेट संघइंग्लंडमुंबई