दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप केलं. रोहित शर्माचे कसोटी कर्णधार म्हणून हे पदार्पण होते आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारताला सलग दोन कसोटी जिंकता आल्या. रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे वारंवार कौतुक होत असले तरी आता माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने मोठा दावा केला आहे. रोहित शर्मा कसोटीत विराट कोहलीपेक्षा चांगला कर्णधार म्हणून नावारूपास येईल, असे वसीम जाफरने विधान केलं आहे. साहजिकच या दाव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे.
विराट कोहली हा आकडेवारीच्या आधारे भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने कसोटी क्रिकेटवर बराच काळ राज्य केले आहे. पण श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर वसीम जाफरने एका मुलाखतीत सांगितले की, रोहित शर्मा एक महान कसोटी कर्णधार बनू शकतो. रोहित शर्मा किती कसोटी सामन्यांमध्ये कर्णधार असेल हे माहीत नाही, पण रणनितीच्या दृष्टीने तो एक चांगला कर्णधार असल्याचं सिद्ध होईल. गेल्या काही मालिकांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली भारताने प्रतिस्पर्ध्यांना व्हाईटवॉश झाल्याचे आपण पाहिले आहे. त्यामुळे आता कर्णधारपद योग्य व्यक्तीच्या हाती आल्याचे दिसते.
आकडेवारीवर नजर टाकल्यास विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. रोहित शर्माने मात्र कसोटी कर्णधार म्हणून आपल्या कारकिर्दीला आताच सुरुवात केली आहे. या मालिकेतील केवळ दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने कर्णधारपद भूषवले. त्या दोन्ही कसोटी भारताने जिंकल्या. विराट कोहलीने ६८ सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले. त्यात ४० सामन्यांत विजय मिळवला तर १७ सामने गमावले. विराट कोहलीनंतर यादीत धोनीचा नंबर लागतो. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २७ कसोटी विजय मिळवले.