Rohit Sharma Virat Kohli, IND vs AUS 2nd Test: ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरु झालेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात दमदार झाली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पर्थच्या मैदानावर पराभवाची धूळ चारली. पर्थवर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा भारत हा पहिला संघ ठरला. पहिल्या डावात भारताचा डाव १५० वर तर ऑस्ट्रेलियाचा डाव १०४ धावांवर आटोपला होता. दुसऱ्या डावात भारताने ५०० पार मजल मारली. हे आव्हान ऑस्ट्रेलियाला न पेलल्याने त्यांचा २९५ धावांनी पराभव झाला. सामन्यात ८ गडी मिळवणारा हंगामी कर्णधार जसप्रीत बुमराहला सामनावीराचा किताब मिळाला. आता दुसऱ्या सामन्यापासून संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणार आहे. त्यासोबतच त्याला विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींगला मागे टाकण्याची संधी आहे.
६ डिसेंबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अडलेडमध्ये मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु होणार आहे. दुसऱ्यांदा बाबा झाल्याने पहिल्या सामन्याला मुकणारा रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यापासून पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे. भारत या मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. जर भारताने दुसरी कसोटी जिंकली, तर रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलिया विरूद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावेल.
विराट, राहणे, गांगुलीशी बरोबरीची संधी
रोहित शर्माने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरूद्ध चार कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी दोन सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. रोहितला खास यादीत प्रवेश मिळण्यासाठी एका विजयाची गरज आहे. रोहितने दुसरी कसोटी जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत तो विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि सौरव गांगुली यांच्यासह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर येईल. या यादीत १३ पैकी ८ विजयांसह महेंद्रसिंग धोनी अव्वलस्थानी आहे.
रिकी पॉन्टींगला मागे टाकणार?
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेबाबत बोलायचे तर रोहितला रिकी पॉन्टींगला मागे टाकण्याची संधी आहे. रिकी पॉन्टींगने बॉर्डर-गावसकर मालिकेत २ सामनेच जिंकले आहेत. रोहितने आणखी सामना जिंकल्यास तो पॉन्टींगच्या पुढे जाईल.