Rohit Sharma Virat Kohli, IND vs NZ 1st Test: बांगलादेश विरुद्ध दणदणीत विजय मिळवलेल्या टीम इंडियाची उद्यापासून तुल्यबळ न्यूझीलंड संघात विरुद्ध कसोटी मालिका ( India vs New Zealand ) सुरू होणार आहे. या मालिकेत तीन सामने असून त्यातील पहिला सामना उद्या बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर सुरू होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्याला तर तिसरा सामना १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दोनही संघांनी कसून तयारी केली आहे. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघांकडे तोलामोलाचे खेळाडू असल्याने कसोटी मालिका रंजक होईल, यात वादच नाही. या मालिकेत भारतीय संघाच्या कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे आपला संघातील सहकारी आणि माजी कर्णधार विराट कोहली याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
रोहित मोडणार विराटचा विक्रम
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत आपल्या नेतृत्वाची चुणूक पुन्हा एकदा दाखवून दिली. तशातच आता न्यूझीलंड विरुद्ध रोहित शर्माकडे एक मोठा विक्रम करण्याची संधी चालून आली आहे. भारतीय संघ जर न्यूझीलंड विरुद्ध तीनही सामने जिंकला, तर रोहित शर्मा विराट कोहलीला मागे टाकेल. भारताचा कसोटी कर्णधार असताना विराट कोहलीने एकूण २२ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. त्यापैकी त्याने १४ सामने जिंकले, ७ सामने गमावले तर १ सामना अनिर्णित राहिला. रोहित शर्मा कसोटीचा कर्णधार झाल्यापासून त्याने आतापर्यंत १८ सामन्यात नेतृत्व केले आहे. त्यापैकी त्याने १२ सामने जिंकले असून ४ सामने गमावले तर २ सामने अनिर्णित राहिले. जर भारताला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत तीनही सामने जिंकता आले, तर कर्णधार म्हणून रोहित शर्मा १५ कसोटी सामने जिंकेल आणि विराट कोहलीला मागे टाकेल.
गांगुलीलाही मागे टाकण्याची संधी
रोहित शर्माकडे याव्यतिरिक्त माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याचा विक्रम मोडण्याची ही संधी आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सौरव गांगुलीने एकूण तीनही फॉरमॅटमध्ये मिळून ९७ वेळा भारताला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने आतापर्यंत भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून ९५ विजयाची नोंद केली आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध भारताने तीन सामने जिंकल्यास रोहितची विजयाची संख्या गांगुली पेक्षा जास्त होईल. तसेच तो भारताच्या यशस्वी कर्णधारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर येईल. या यादीत महेंद्रसिंग धोनी १७८ विजयांसह पहिल्या क्रमांकावर, विराट कोहली १३५ विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर तर मोहम्मद अझरुद्दीन १०४ विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.