मोहाली - श्रीलंकेविरोधातील दुस-या एकदिवसीय सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने तिसरं द्विशतक ठोकत इतिहास रचला आहे. रोहित शर्माने 208 धावांची नाबाद खेळी केली. यासोबत एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकणारा पहिला कर्णधारही ठरला आहे. रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये द्विशतकांची हॅटट्टीक केली आहे. रोहितचं हे श्रीलंकेविरोधातील दुसरं द्विशतक होतं. 2013 मध्ये रोहित शर्माने कांगारुंविरुद्ध कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावलं होतं. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांची खेळी साकारली होती. 13 नोव्हेंबर 2014 या दिवशी सलामीवीर रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार खेळी केली होती. रोहित शर्माने 264 धावा करत वनडेतील दुसरे द्विशतक झळकावले होते. श्रीलंकेविरुद्धची ही खेळी रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे.
सामना संपल्यानंतर भारतीय संघाने हॉटेलमध्ये केक कापून रोहितचं यश साजरं केलं. यावेळी अंजिक्य रहाणे आणि चहलने रोहितच्या चेह-यावर केक लावून मस्ती केली.
पहा व्हिडीओ -
रोहितचं हे या वर्षातील सहावं शतक ठरलं आहे. विराट कोहलीनेदेखील यावर्षी सहा शतकं केली आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 1996 मध्ये एका वर्षात सहा शतकं केली होती. एका वर्षात सर्वात जास्त शतकं ठोकण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने 1998 मध्ये नऊ शतकं केली होती. सचिन तेंडुलकरनेच एकदिवसीय सामन्यात पहिलं द्विशतक केलं होतं.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत सात द्विशतक झाली आहेत आणि यामधील तीन रोहित शर्माच्या नावे आहेत. बाकीचे चार द्विशतक सचिन तेंडुलकर (200), मार्टिन गुप्तिल (237), विरेंद्र सेहवाग (219), क्रिस गेल (215) यांच्या नावे आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये वनडेतील पहिलं वहिलं द्विशतक झळकावले, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 200 धावांची खेळी केली होती. वेस्ट इंडिजचा धमाकेदार फलंदाज ख्रिस गेलने झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावांची खेळी केली असून, न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलने वेस्ट इंडिजविरुद्ध 237 धावांची नाबाद खेळी करत द्विशतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले होते. भारताचा धमाकेदार फलंदाज वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध 219 धावांची तुफानी खेळी केली होती. रोहित शर्माने 173 एकदिवसीय सामन्यांमध्ये 16 शतकांच्या मदतीने 6417 धावा केल्या आहेत.