Rohit Sharma Dominic Drakes, IND vs WI 3rd T20 : भारतीय संघ नवनवे प्रयोग करणार असं कर्णधार विराट कोहली याने आधीच स्पष्ट केलं होतं. त्यानुसार तिसऱ्या टी२० सामन्यात अनेक प्रयोग दिसून आले. भारतीय संघाने चार बदल केले. विराट कोहली, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार या चौघांना विश्रांती दिली. त्याजागी ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर आणि आवेश खान यांना संघात स्थान मिळाले. प्रयोग म्हणून आज रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरला. पण Mumbai Indiansचा एक डाव रोहित शर्मावर उलटला.
ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन या दोघांना भारताकडून सलामीची संधी देण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरही श्रेयस अय्यर आला. भारताचे दोन गडी बाद झाल्यावर रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर मैदानात उतरला. त्याला लय सापडणं कठीण जात होतंच. त्यातच मुंबई इंडियन्सचा गेल्या वर्षीचा एक डाव रोहितच्या खेळीवर आज उलटला.
मुंबई इंडियन्स आणि रोहितच्या विकेटचं कनेक्शन
रोहित शर्मा जेव्हा खेळताना बाचकत होता, त्यावेळी वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड याने डॉमनिक ड्रेक्स या मध्यमगती गोलंदाजाला आणले. रोहितच्या फलंदाजीबाबत माहिती असलेल्या डॉमनिकने रोहितला बरोबर सापळ्यात अडकवत क्लीन बोल्ड केले. डॉमनिक ड्रेक्स हा गेल्या वर्षी मुंबई इंडियन्स संघाचा नेट बॉलर म्हणून खेळला होता. त्याने रोहित आणि सूर्यकुमार दोघांनाही गोलंदाजी केली होती. त्यामुळे त्याला दोघांच्या उणीवा माहिती होत्या. मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या याच गोष्टीचा त्याने वापर केला आणि रोहितला आपल्या पहिल्याच षटकात त्रिफळाचीत केलं.