टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली शुक्रवारी आपला १००वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित असतील यात वादच नाही. तशातच श्रीलंका कसोटी मालिका ही रोहित शर्मासाठीही कर्णधार म्हणून पहिलीच कसोटी मालिका असणार आहे. विराट आणि रोहित यांच्यात वाद असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू होत्या. पण दोघांनी या केवळ अफवा असल्याचं सांगितलं. असं असलं तरी सामन्याच्या पूर्वसंध्येला गुरूवारी मात्र रोहितच्या तोंडून अचानक एक वाक्य निघालं अन् मग तो थोडा वेळ बोलायचाच थांबला.
रोहित शर्माने प्रथेप्रमाणे मालिका सुरू होण्याआधी ऑनलाईन पद्धतीने पत्रकार परिषद घेतली. त्यात एका पत्रकाराने रोहितला. सवाल केला की, 'तू सुमारे ४० कसोटी सामने खेळला आहेस. तू किती कसोटी खेळण्याचं टार्गेट सेट केलं आहेस?' त्यावर रोहितने हसतहसत उत्तर द्यायला सुरूवात केली. रोहित म्हणाला की, 'मी आता जे काही टार्गेट सेट करतो ते स्वत:साठी करत नाही तर संघाचा विचार करून सेट करतो. माझ्या करियरमध्ये मला अनेक वेळा दुखापतीमुळे संघाबाहेर बसावं लागलं. काही वादही (कुछ अनबन थी) झाले...." अनबन हा शब्द तोंडून निघताच रोहित काहीसा थांबला. पाहा व्हिडीओ-
त्यावेळी रोहितला सहाय्य करण्यासाठी त्या रूममध्ये बीसीसीआयचा एखादा माणूस बसला असावा. त्याने रोहितला वाक्यात दुरूस्ती सुचवत नक्की काय म्हणायचं आहे ते विचारलं. मग रोहितलाही आपली चूक उमगली आणि त्याने इंग्रजीत 'Ups & Down' म्हणजेच चढउतार असं म्हणायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर रोहितने आपलं हिंदी भाषेवर फारसं प्रभुत्व नसल्याची कबुली दिली. मग मात्र पुढच्या उत्तरांमध्ये तू कुठेही शब्द चुकला नाही.